वयाच्या २९ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने घेतलं मुंबईत घर…स्वप्नांचा पाठलाग करत आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश
मुंबईत घर घेणं साधीसोपी गोष्ट नाही. खूप वर्षे मेहनत आणि कष्ट केल्यानंतरच कुठेतरी तुमचे घर घेण्याचे स्वप्न साकार होते. अशातच आता वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकर हिने तिचं हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. केतकी माटेगावकर हिने वयच्या चौथ्या वर्षापासूनच गाण्याला सुरुवात केली होती. केतकीची आई सुवर्णा या गायिका तर वडील हार्मोनियम वादक आहेत. त्यामुळे लहानपणीच तिच्यावर संगीताचे संस्कार घडत गेले. शाळा या चित्रपटातून केतकीने अभिनेत्री म्हणून मराठी सृष्टीत पाऊल टाकले. काकस्पर्श, टाईमपास, टाईमपास २ अशा चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. मुंबईत सतत येणे जाणे होत असल्याने आपलं इथे घर असावं असा तिने विचार केला.
त्यामुळे स्वप्नांचा पाठलाग करत तिने आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश केलेला आहे. उंच आणि शांत ठिकाणी घर असावं या हेतूने केतकीने मुंबईत १९ व्या मजल्यावर फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटच्या इंटेरिअरला तिने व्हाइट थीम आणि टिल कलरची थीम वापरली आहे. केतकीला झाडं, पानं, फुलं खूप आवडतात त्यामुळे हॉलच्या भिंतीला तिने तशाच प्रकारचं वॉलपेपर लावलं आहे. केतकीचे बालपण अतिशय खडतर गेले होते. जेमतेम पैसेच हातात असल्याने घरखर्च कसा भागवावा असा प्रश्न तिच्या बाबांना पडायचा. मुंबईत कार्यक्रमासाठी यायला ती एसटी चा प्रवास करायची. त्यामुळे मोठ्या कष्टाने त्यांनी केतकीला वाढवले होते. पुढे गण्यातूनच केतकीला प्रसिद्धी मिळत गेली. गोरेगावला वडिलांनी फ्लॅट घेतला होता. तो विकून आपण २ बीएचके घेऊ असा आईचा विचार होता. पण केतकीला स्वतःच्या जीवावर फ्लॅट घेण्याची इच्छा होती. त्यासाठी मुंबईत शोधाशोध सुरू झाली.
नोव्हेंबर तिने हा फ्लॅट बुक केला. १८ व्या मजल्यावर केतकीच्या बाबांनी फ्लॅट बुक केला तिथेच १९ मजल्यावर केतकीने तिच्या हिमतीवर स्वतःचा पहिला फ्लॅट बुक केला असे दोघांनी दोन फ्लॅट खरेदी केले. स्वतःच्या हक्काचं घर घेण्यासाठी केतकीला बचत देखील करावी लागली. ती म्हणते की “गेले काही दिवस मी शॉपिंग देखील केली नाही. आईचे दागिने, मैत्रिणींचे कपडे मी वापरले आहेत. माझ्यासाठी फ्लॅट घेणं मुळीच सोपं नव्हतं पण फ्लॅट बुक केल्यानंतर लगेचच एका आठवड्यात ‘मीरा’ फिल्म ऑफर झाली. मी ह्या वयात फ्लॅट घेतला याचं कौतुक माझ्या आईबाबांना आहे, कारण त्यांनी या वयात २ हजारात घर चालवलं होतं. माझ्या काकांना मी घर घेतल्याचं सरप्राईज दिलं तेव्हा त्यांनी मला टीव्ही गिफ्ट केला. त्यांनाही माझ्या घर घेण्याचं खूप कौतुक आहे.” या यशाचं श्रेय ती आईबाबांना देते सोबतच महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, अशोक पत्की आणि फॅन्समुळे हे सर्व शक्य झालं असं ती सांगते.