आता त्यांच्या पोटात दुखायला लागलं… १९९८ पासून ओळखतो त्या माणसाला छळायचं आणि त्रास द्यायचा या पलीकडे
नथुराम विरुद्ध नथुराम असा वाद नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. मी “नथुराम गोडसे बोलतोय” हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल होत असल्याने नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. नाटकाचे शीर्षक चोरल्याप्रकरणी उदय धुरत यांनी शरद पोंक्षे यांना नोटीस पाठवली आहे. आणि यासंदर्भात कायदेशीर लढाई लढण्यासाठी देखील आमची तयारी आहे असा इशाराच धुरत यांनी शरद पोंक्षे यांना दिला आहे. हा वाद नेमका काय आहे यावर थोडा प्रकाश टाकूयात. शरद पोंक्षे यांनी ” मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकात प्रमुख भूमिका साकारली होती. हे नाटक उदय धुरत यांनी निर्माते म्हणून १९९८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. त्यावेळी नाटकाच्या वादग्रस्त कथेमुळे हे नाटक चांगलेच चर्चेत राहिले होते. काही वर्षांनी उदय धुरत यांनी या नाटकाची निर्मिती करण्याचे थांबवले.
मात्र जुलै महिन्यात मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक पुन्हा ऑक्टोबर मध्ये रंगभूमीवर दाखल होत असल्याची जाहिरात पेपरमध्ये देण्यात आली होती. या नाटकाचे लेखन प्रदीप दळवी यांनी केले आहे तर दिग्दर्शन विनय आपटे यांनी केलं होतं. नथुराम गोडसेच्या भूमिकेसाठी अभिनेता सौरभ गोखलेची निवड करण्यात आल्यानंतर नाटकाची तालीम ३ ऑक्टोबर पासून होईल असे सांगितले होते. त्यानंतर हे नाटक नोव्हेंबर मध्ये रंगभूमीवर येईल असे जाहीर करण्यात आले. पण हे नाटक रंगभूमीवर येण्याआधीच शरद पोंक्षे यांनी देखील त्यांच्या नाटकाची जाहिरात केली. ऑगस्ट महिन्यात शरद पोंक्षे यांनी याच नावाचे शीर्षक असलेले नाटक रंगभूमीवर येईल असे जाहीर केले. ७ ऑक्टोबर रोजी नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. असे एकूण ५० प्रयोग करण्यात येतील असे त्यांनी जाहीर केले होते. पण उदय धुरत यांनी एवढ्या मोठया कलाकाराला नाटकाचे शीर्षक का चोरावेसे वाटले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात धुरत यांनी पोंक्षेना नोटीस पाठवली आहे. तेव्हा शरद पोंक्षे या वादावर प्रथमच एक प्रतिक्रिया देत आहेत. शरद पोंक्षे यांचे या वादावर म्हणणे आहे की, “ही माझी आवडती भूमिका आहे, आम्ही सगळे भूमिकेवर प्रेम करणारे कलावंत आहोत.
आम्हाला कोर्ट कचेऱ्या हे सगळं करून थांबवायचं नाही आम्हाला, तुम्हीही करा, आम्हीही करतो, सजवून कोणी हे नाटक करतंय त्याला ते करू देत. राज्यनाट्य स्पर्धेत सुद्धा नाशिकच्या ग्रुपने हे नाटक केलं होतं. त्यामुळे करू दे ना सगळ्यांना, आमचं काहीही म्हणणं नाही. कोणी आमच्याविरोधात कोर्टात गेलं तर त्याला कोर्टात उत्तर देऊ. आता नथुराम गोडसे बोलतोय हे नाव त्यांच्या नावाशी जुळतंय तर त्यांच्या पोटात दुखतंय. कारण मी १९९८ पासून ओळखतो त्या माणसाला. लोकांना फक्त छळायचं आणि त्रास द्यायचा या पलीकडे त्याने काही केलेलं नाही. त्यांनी कोर्टात जाण्याची धमकी जरी दिली तरी आम्ही कोर्टात जाऊ”. असा शरद पोंक्षे यांनी पवित्रा घेतला आहे. दरम्यान शरद पोंक्षे यांनी २०१६ साली या नाटकाच्या नावाची सेन्सॉरकडे नोंद केली होती. मी नथुराम गोडसे बोलतोय हे एकमेव शीर्षक असलेलं नाटक त्यांच्याकडे नोंद करण्यात आलेलं आहे असे त्यांचे म्हणणे आहे.