वर्षा उसगावकर या गेली चार दशकं मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. या वयातही त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज पाहून एक चिरतरुण अभिनेत्री अशी ओळख त्यांनी मराठी सृष्टीत जपली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून त्या महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. सोबतच प्रशांत दामले यांच्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातही त्या प्रमुख भूमिकेत आहेत. यंदाचा गणेशोत्सव त्यांनी आपल्या गावी साजरा करण्याचे ठरवले होते. प्रशांत दामले यांनाही त्यांनी तसे सांगितले होते की , ‘नाटकाचे दौरे रद्द कर कारण मी माझ्या गावी गणेशोत्सव साजरा करायला जातीये’ अशी प्रेमळ तंबीच त्यांनी प्रशांत दामले यांना दिली होती.
त्यामुळे वर्षा उसगावकर सध्या त्यांच्या गोव्यातील उसगाव या गावी राहायला गेल्या आहेत. उसगाव हे वर्षा उसगावकर यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांचे आडनाव पडले आहे. वर्षा उसगावकर यांचे वडील राजकारणी. गोव्याचे विधानसभेचे उपसभापती म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. गावी घरचा गणपती असल्याने या उत्सवाला आपण जायचं हे त्यांनी ठरवलं होतं. गावातील त्यांच्या माहेरच्या घराचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. घरासमोर आकर्षक तुळशीवृंदावन सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. आतमध्ये गेल्यानंतर एकापुढे एक अशा प्रशस्त खोल्या आहेत. समोरच एक स्वतंत्र खोली आहे त्यात गणपती बाप्पा विराजमान झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. वर्षा उसगावकर यांच्या घराला गिरीजा प्रभूने भेट दिली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत तिने गौरीची भूमिका साकारली आहे. वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या या गौरीचे स्वागत मोठ्या थाटात केलेले पाहायला मिळते. मालिकेमुळे या दोघींमध्ये छान बॉंडिंग जुळून आलेले आहे त्याचमुळे वर्षा उसगावकर यांनी गिरीजाला यांच्या गोव्याच्या घरी खास आमंत्रण दिले आहे.
वर्षा उसगावकर यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास फारच उल्लेखनीय ठरला आहे. शाळेत असल्यापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. गणितात खूप कमी मार्क्स मिळाले म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचे डान्सचे क्लास बंद केले होते, तेव्हा वर्षा उसगावकर यांना प्रचंड राग आला होता. कधीही कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग न घेतलेल्या वर्षा यांनी ९ वीत असताना एक नृत्य सादर केले होते. अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं म्हणून त्यांनी औरंगाबाद येथे नाट्यशास्त्राचे धडे गिरवले. नाटक, एकांकिका करत असताना ब्रह्मचारी नाटकाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. अशातच दूरदर्शनच्या राणी लक्ष्मीबाई मालिकेत त्यांना लक्ष्मीबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेचे दिग्दर्शन हेमा मालिनी करत होत्या. तेव्हा त्यांनी वर्षा उसगावकर यांना घोड्यावर बसण्याचे प्रशिक्षण घ्यायला सांगितले होते. या भूमिकेने वर्षा उसगावकर प्रकाशझोतात आल्या. गंमत जंमत, अफलातून, सगळीकडे बोंबाबोंब, हमाल दे धमाल असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या वाट्याला आले.