चुकून गणपतीच्या मूर्तीला धक्का लागला सोंड आणि हात निखळून पडला… भयंकर अपराध झाल्यासारखं वाटलं मग गुरुजींनी दिला हा सल्ला
आदेश बांदेकर यांनी गणेशोत्सव काळातला एक जुना किस्सा इथे शेअर केला आहे. नुकतेच आदेश बांदेकर आणि सुचित्राचे लग्न झाले होते. त्यांचे हे लव्हमॅरेज होते त्यामुळे सुचित्राचे कुटुंब आपल्याला स्वीकारतील की नाही अशी त्यांच्या मनात भीती होती. लग्नानंतर सूचीत्राच्या मावशीने गणेशोत्सवासाठी दोघांना आमंत्रित करण्यात आले होते. मनात धाकधूक होतीच पण तरीही आदेश बांदेकर त्यांच्या घरी पोहोचले. मावशीच्या घरी आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती आणली जाते ती मूर्ती त्यांनी कपाटाच्या बाजूलाच ठेवून दिली होती. मावशीच्या घरी भाग्यश्री नावाची छोटीशी मुलगी होती तिने आदेश बांदेकर यांना लाईट लावायला सांगितली. तेव्हा लाईट लावताना चुकून आदेश बांदेकर यांचा धक्का त्या कपटाला लागला. तेव्हा जवळच असलेल्या गणपतीच्या मूर्तीची सोंड आणि हात निखळून पडला.
समोरचे दृश्य पाहून आदेश बांदेकर यांना आपण काहीतरी भयंकर अपराध केला असे वाटू लागले. तेवढ्यात त्या भाग्यश्रीने म्हटले की, “बघ आता तुला गणपती बाप्पा शिक्षा करणार.” त्यावेळी आदेश बांदेकर खूप गोंधळले. त्यांनी ती गणपती बाप्पाची मूर्ती उचलली त्यावर रुमाल टाकला आणि अनवाणी रस्त्याने धावत सुटले.गल्लीतून बाहेर निघताच त्यांना समोर फडकेवाडी गणपतीचं मंदिर दिसलं. तिथे त्या मंदिरात आलेल्या गुरुजींसमोर मूर्ती ठेवली आणि आपल्याकडून भयंकर अपराध झाला या भावनेने त्यांनी गुरुजींना सल्ला विचारला. आता मी काय करू? हा प्रश्न विचारताच गुरुजींनी आदेश बांदेकर यांना शांत केले. काळजी करू नका अजून या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा झालेली नाही. त्यामुळे ही मूर्ती फक्त मातीची आहे एवढेच मनात ठेवा आणि ही मूर्ती पाण्यात विसर्जित करा. असे गुरुजींनी सांगताच आदेश बांदेकर पाट घेऊन धावत गिरगावच्या चौपाटीवर गेले आणि तिथे ही मूर्ती विसर्जित केली. त्यानंतर मी फडके वाडीत सगळीकडे पाट घेऊन नवीन मूर्ती घेण्यासाठी फिरू लागलो.
एका दुकानात एकच मूर्ती होती ती घेतली आणि जवळपास दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुचित्राच्या मावशीच्या घरी गेल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा केली. हा अनुभव आदेश बांदेकर यांच्या मनात सलत होता. भाग्यश्रीच्या म्हणण्यानुसार देवबाप्पा आपल्याला कुठली शिक्षा करणार हे त्यांच्या सतत मनात येत होतं. याबद्दल आदेश बांदेकर सांगतात की, “पण आता जेव्हा हे सगळं मागे वळून बघताना वाटतं की गणपती बाप्पाने शिक्षा दिली पण ती प्रेमाची शिक्षा दिली की, तुला लोकांचं आयुष्यभर मनोरंजन करायचंय. लोकांच्या डोक्यावरचं दडपण आहे ते दूर करण्यासाठी तुला धावायचंय. त्या दिवसापासून माझी आनंदाची यात्रा सुरू झाली.”