आम्हाला पैसे नकोयेत…काहीजण अंजलीच्या नावाने फेक अकाउंट बनवत आमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अंजलीची ओळख काल तुम्हाला एका पोस्टच्या माध्यमातून करून देण्यात आली होती. अंजली बाई या नावाने इंस्टाग्राम अकाउंट असलेली अंजली शिंदे मजेशीर व्हिडीओ बनवून तिच्या चाहत्यांना हसवण्याचे काम करत होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी अंजलीला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले होते. अंजलीवर सोलापूर येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.डॉ मुडकन्ना, डॉ विजय जोशी, डॉ दुर्गे आणि डॉ काळे यांनी अंजलीवर उपचार केले आहेत त्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. सोलापूर बाहेरील काही डॉक्टरांनी अंजली यातून वाचणार नाही असे म्हटले होते. पण स्पर्श च्या डॉक्टरांनी अंजलीवरचे हे मोठे संकट दूर केले आहे. तिच्या तब्येतीत आता हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. अंजली आणि तिचा नवरा आकाश नारायणकर या दोघांनाही आईवडील नाहीत.
अशातच या कठीण प्रसंगात त्यांना चाहत्यांकडून खूप मोठे सहकार्य मिळत आहे. अनेकजण स्वतःहून आपुलकीने काही मदत लागली तर विचारपूस करून स्वतःचे फोन नंबर देउ लागले आहेत. तर अनेकांनी आर्थिक स्वरूपाची मदत देण्यासाठी सहकार्य केले आहे. मात्र आता अंजली आणि आकाशच्या या परिस्थितीचा काहीजण गैरफायदा घेत आहेत. आकाशने एका व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. अशा फेक अकाउंट बनवणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा त्याने सल्ला दिला आहे. अंजलीचे ऑपरेशन झाले असून आम्हाला पैसे नकोयेत असे आवाहन त्याने केले आहे. आम्हाला आमच्या चाहत्यांनी खूप प्रेम आणि सपोर्ट दिला हेच महत्वाचं आहे. मी कुठल्याही एनजीओकडून पैसे मागितलेले नाहीत. काहीजण अंजलीच्या नावाने फेक अकाउंट बनवत आहेत. आमचं ऑफिशियल पेजवरच तुम्हाला आम्ही अधिकृत माहिती देत जाऊ असे आकाशने म्हटले आहे. दरम्यान अंजलीच्या या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी काही फेक अकाउंट काढले जात आहेत. त्यात सगळे मिळून पैसे जमा करू आणि यातून अंजलीला मदत करून असे म्हटले जात आहे. त्या फसव्या लोकांपासून सावध राहण्यासाठी आकाशने त्याच्या चाहत्यांना आवाहन केलेले आहे.