मराठी सृष्टीतील देखण्या अभिनेत्याचा मुलगा म्हणून गश्मीर महाजनीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. गश्मीर एका मोठ्या स्टारचा मुलगा पण त्यालाही या इंडस्ट्रीत आल्यावर काम मिळवण्यासाठी वाडीलांसारखा संघर्ष करावा लागला. मी वाडीलांसारखा देखणा नाही पण त्यांच्यासारखा स्मार्ट आहे असे तो आपल्या दिसण्याबाबत म्हणतो. देऊळ बंद या चित्रपटाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली मात्र त्याअगोदर त्याने आपल्या करिअरची सुरुवात नाटक, एकांकिकेपासून केली होती. अशातच त्याला पहिली संधी मिळवून दिली ती हिंदी चित्रपटाने. ‘मुस्कुराके देख जरा’ हा गश्मीरचा पहिला हिंदी चित्रपट. त्यानंतर ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटातून त्याने मराठी सृष्टीत पदार्पण केले.
सध्या गश्मीरकडे वेबसिरीज आणि चित्रपटाच्या ऑफर आहेत. यामध्ये तो स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण वडिलांच्या निधनानंतर तो इतके दिवस लोकांच्या टीकेला सामोरे जात होता. पण मनातली एक खदखद आज त्याने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. गश्मीरची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणतो की, “एक स्वप्न आहे. ते रोज येतं. कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं. मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही. मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला. माझच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पहायचो. तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं. म्हातारं झालं आणि लाचार झालं. ” गश्मीरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना आयुष्यात अशा घटना घडतात ज्यामुळे ती स्वप्न अधुरी राहतात.
आयुष्यात आलेल्या या वळणामुळे मोठ्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव होते. त्यामुळे ती स्वप्न बाजूला सारून जबाबदारी स्वीकारणे तेवढेच अवघड आहे. ती पाहिलेली स्वप्नं आता परिस्थिती पुढे लाचार झाली आहेत अशी एक खदखद गश्मीरने व्यक्त केली आहे. त्याच्या या दाटून आलेल्या भावना पाहून त्याचे चाहते त्याला धीर देत आहेत. त्याच्या एका फॅनने म्हटले आहे की,’ ते स्वप्न पूर्ण केल्याने तुझं मन शांत होणार असेल तर मग ते स्वप्न पूर्ण करच तू , करशीलच अर्थात …मनावर कुठलंच दडपण घेऊ नको, भूतकाळ बाजूला ठेव.. झालं त्यात तुझी चूक काहीच नाही, अनेकोत्तम शुभेच्छा’..