कित्येक तास पैसे मागण्यासाठी त्यांच्या पाया देखील पडले पण … मालिकेतून काढून टाकल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याचा धक्कादायक खुलासा
अभिनेत्री म्हणून तुम्हाला अपयश मिळतं तेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता पण जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवला तर त्यातूनही तुम्हाला योग्य तो मार्ग सापडतो. हा अनुभव घेतलाय प्रसिद्ध अभिनेत्री युट्युबर उर्मिला निंबाळकर हिने. उर्मिला निंबाळकर हिने नुकतेच तिच्या युट्युब चॅनलवर १० लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा गाठला आहे. यासाठी गुगलने तिच्या कामाची दखल घेतली आहे आणि त्यांच्या कार्यशाळेसाठी तिची टॉप क्रिएटर्स म्हणून निवडही करण्यात आली आहे. उर्मिला निंबाळकर हिने दिया और बाती हम, बन मस्का, दुहेरी, डम डम डिगा डिगा अशा हिंदी मराठी मालिकांमधून काम केले आहे. पण अभिनय क्षेत्रातील तिचा हा प्रवास खूपच भयंकर होता. कारण उर्मिलाला दरवेळी मालिकेतून काढून टाकले जायचे. यासंदर्भात तिने तिच्या युट्युब चॅनलवर एक खुलासा केला आहे. यात ती तिच्या डिप्रेशनबद्दलही भरभरून बोलते.
उर्मिला ज्या मालिकेत काम करत होती त्या मालिकेतून तिला काढून टाकण्यात आले होते. आपण चांगले दिसत नाही, चेहऱ्यावर दाढीच दिसते, कपाळच मोठं दिसतं, तुझा ओठांवरचा तीळ काफहून टाक अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिला सहकालाकारांकडूनच कमी लेखले जायचे. त्यावेळी मालिकेत काम करत असताना मेकअप करायलाही कोणी तिच्याकडे येत नसे. तेव्हा आपण शून्य आहोत असं तिला वाटू लागलं. आपल्याला काहीच जमत नाही, लोक आपल्या कामाचे पैसेही देत नाहीत, कित्येक तास आपण पैसे मागण्यासाठी त्यांच्या पाया देखील पडले पण काहीच चांगलं होत नाही हे पाहून उर्मिलाला आपण शून्य आहोत असे वाटू लागले. त्यानंतर ती सतत आजारी पडतीये असे म्हणून तिने मालिका सोडली हे तिच्याकडून कागदावर साइन करून घेतलं. तेव्हा मात्र उर्मिला खूप डिप्रेशन मध्ये गेली. मन आजारी पडावं असं तिच्याबाबतीत झालं. स्वयंपाक करण्यातही तिचं मन रमेना आपल्याला जेवण सुद्धा बनवता येत नाही अशी निगेटिव्हीटी तिच्या मनात घर करून बसली होती. अर्थात सुकीर्त हा तिचा नवरा तिला वेळोवेळी साथ देत राहिला, घरच्यांचीही तिला साथ मिळत होती. ही निगेटिव्हीटी बाजूला सारण्यासाठी उर्मिलाने मोटिव्हेशन स्पिक्स ऐकायला सुरुवात केली. त्यानंतर ह्या व्यक्ती सुद्धा डिप्रेशनमधूनच सावरून लोकांना मोटिव्हेट करतात हे तिच्या लक्षात आले. सुकीर्तच्या मदतीने तिने स्वतःचा युट्युब चॅनल सुरू करण्याचे ठरवले. गुढी पाडव्याच्या दिवशी उर्मिलाने तिच्याजवळ असलेल्या मेकअपच्या साहित्यातून झटपट मेकअप कसा करायचा याचा व्हिडीओ बनवला, लोकांना तो खुप आवडला. पण त्यानंतर आता आपल्याला कमी व्ह्यूव्ह्ज मिळतात हे पाहून पुन्हा ती डिप्रेशन मध्ये जाईल याची सुकीर्तला भीती वाटत होती.
पण कालांतराने उर्मिलाने पैठणी साडी कशी ओळखायची याचा व्हिडीओ केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे उर्मिलाला मोठी प्रसिद्धी मिळाली, लोक तिला ओळखू लागले भेटू लागले. काहीतरी साध्य होतंय हे पाहून तिच्याकडे काही ब्रँड्सच्या जाहिराती येऊ लागल्या. मालिकेत काम करताना उर्मीलाने लिपस्टिक चोरली असा आळ तिच्यावर घेण्यात आला होता. त्यावेळी उर्मिलाच्या पर्सची झाडाझडती घेण्यात आली होती पण त्याच ब्रॅण्डने आपल्याकडे जाहिरातीसाठी यावे ही गोष्ट तिला मनोमन सुखावणारी ठरली. आता आपलं काम लोकांना आवडू लागलंय याची जाणीव तिला झाली. हळूहळू दर्जेदार कंटेंट क्रिएट करून ती लोकांकडून पसंती मिळवू लागली. आज तिच्या व्हिडीओला लाखोंची व्ह्यूवज मिळू लागले आहेत. या पॉजिटीव्ह गोष्टींमुळे उर्मिलाचा आत्मविश्वास वाढू लागला. आपण शून्य आहोत ता डिप्रेशन मधून बाहेर पडत आता ती दहा लाख लोकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. उर्मिलाचा हा खडतर प्रवास या मुलाखतीत तिने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे जो खरंच उल्लेखनीय कामगिरी करणारा आहे.