झी मराठीच्या मालिकेच्या वेळेत होणार बदल… चल भावा सिटीत नव्या मालिकेमुळे जुण्या मालिकांना डच्चू

येत्या १५ मार्चपासून रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी ‘चल भावा सिटीत’ हा नवीन रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे. माझी तूझी रेशीमगाठ या मालिकेनंतर श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. चल भावा सिटीत या शोमध्ये जामखेडचा सुभाष चौगुले आणि चंदनपुरीचा रामा सोनवणे असे २ स्पर्धक सहभागी होणार असल्याचे दिसून येते. यात आणखी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची ओळख झी मराठी वाहिनी लवकरच करून देणार आहे.
त्यामुळे या शोचे स्वरूप नेमके काय असेल याचा अंदाज प्रेक्षकांकडून बांधला जात आहे. दरम्यान चल भावा सिटीत हा शो १ तासांचा असणार आहे. त्यामुळे ९.३० वाजता प्रसारित होत असलेली लाखात एक आमचा दादा आणि १०.०० वाजता प्रसारित होत असलेली नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल होत आहे. तर अप्पी आमची कलेक्टर आणि पुन्हा कर्तव्य आहे या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतील असे बोलले जात आहे. महत्वाचं म्हणजे अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून अभिनेता रोहित परशुराम याने एक्झिट घेतली आहे.

अर्जुनच्या भूमिकेला त्याने आता कायमचा रामराम ठोकला आहे. रोहित परशुराम हा कुस्तीपट्टू आहे. त्यामुळे याच क्षेत्रात राहून त्याची तालमीला सुरुवात झाली आहे. त्याच्या अर्जुनच्या भूमिकेला निरोप देण्याने अप्पी आमची कलेक्टर मालिका संपणार असे बोलले जात आहे. मालिका संपणार की दुसरा अर्जुन पाहायला मिळणार याबद्दल येत्या काही दिवसातच स्पष्टीकरण मिळेल. तूर्तास चल भावा सिटीत या रिऍलिटी शोमुळे किमान दोन मालिका तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार हे निश्चित झाले आहे.