नेपोटीझम हा शब्द प्रेक्षकांना काही नवीन नाही. पण याच शब्दामुळे अनेक स्टारकिड्सची दुरावस्था झालेली आहे. कलाकारांचा मुलगा कलाकारांच असावा हे अगोदर गृहीत धरलं जायचं पण आता प्रेक्षकांना यात बदल घडायला हवेत असं वाटत आहे. पण आजही इंडस्ट्रीत नेपोटीझमसारखे प्रकार समोर येताना दिसत असले तरी काहींना त्यात यश मिळते तर काहींना मात्र अपयश मिळते. अभिनेते विजय चव्हाण यांच्या पश्चात त्यांचा मुलगा वरद चव्हाण या इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी आजही खस्ता खातोय. मध्यंतरी तो बाईपण भारी देवा या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत झळकला होता. पण या इंडस्ट्रीतील लोकांनी त्याच्याकडे मुद्दामहून कानाडोळा केलेला पाहायला मिळाला.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वरद चव्हाण याने ही खंत बोलून दाखवली आहे. “मला कित्येकदा समोर तू विजय चव्हाणचा मुलगा का? म्हणून प्रश्न विचारले पण इंडस्ट्रीत कोणीही काम द्यायला तयार होत नाही. बाबांनी माझं शिक्षण केलं, पण या इंडस्ट्रीत तू तुझी ओळख स्वतः मिळवायची असा समजच त्यांनी सुरुवातीला करून दिला होता. मी तुझ्यासाठी कुणाला काम मागणार नाही, तुझं काम तू तुझ्याच कर्तृत्वातून मिळवायचं! असं त्यांचं मत असायचं. पण काही मोजक्या चित्रपट, मालिकांमधून मी लोकांसमोर येत राहिलो. मी त्यांच्याबरोबर असायचो तेव्हा बाबांना लोक म्हणायचे की, “स्पॉटबॉय ठेवलाय वाटतं!”…इंडस्ट्रीतील एका मोठ्या अभिनेत्याकडे मी गेलो तेव्हा मी ड्रायव्हरजवळ कित्येक तास उन्हात वाट पाहत उभा होतो. त्यांना जरासुद्धा वाटलं नाही की मला त्यांनी आत बोलावं.
मी एका इंटव्युसाठी गेलो होतो तेव्हा तर तिथे माझ्या कडील कागदपत्रांची त्यांनी सुरळी केली होती. आजही मी कुठे काम मिळतंय का या साठी धडपडत असतो. माझी बायको प्रज्ञाचा मला मोठा सपोर्ट आहे. तिने मला दरवेळी साथ दिली आहे. पण कुठेतरी असंही वाटतं की कोणीतरी मला एखादा प्लॅटफॉर्म तरी मिळवून द्यावा. मी नाटकातून काम करायला तयार आहे. ५०० नाही पण मी २५० रुपयातही काम करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला तो प्लॅटफॉर्म तरी मिळवून द्या. ” असे वरद त्याच्या स्ट्रगललाईफबद्दल भावना व्यक्त करत आहे. सध्या विजय चव्हाण हयात नाहीत त्यामुळे हाताला काहितरी काम मिळवण्यासाठी तो धडपडतो आहे. काही वर्षभरापूर्वी त्याने स्वतःचा युट्युब चॅनल सुरू केला होता. त्याला नेटकऱ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.