पाश्चिमात्य देशात ऍव्हेंजर्स सारखे चित्रपट बनवायला लागतात कारण त्यांच्याकडे…. शेवटी विकी कौशलने मौन सोडलं
येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित “छावा” हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर रश्मीका मंदना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये औरंगजेबाची एक झलक पाहायला मिळाली. त्यात अभिनेता अक्षय खन्ना ही भूमिका साकारत असल्याचे दिसून येते. छावा चित्रपटात बऱ्याचशा मराठी कलाकारांना संधी मिळाली असल्याचे बोलले जाते येत्या काही दिवसांत ही नावं जाहीर करण्यात येतील.
चित्रपटानिमित्त विकी कौशल सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेला होता. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विकी कौशलने या चित्रपटाबद्दल एक खास वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं. “पाश्चिमात्य देशातील लोकांना ऍव्हेंजर्स सारखे चित्रपट बनवायला लागतात कारण त्यांच्याकडे कुठलेही सुपर हिरोज नाहीत. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे अस्सल सुपरहिरोज आहेत.” विकी कौशलच्या या वक्तव्यावर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. छावा चित्रपटासाठी विकी कौशलने मोठी मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या लुकमध्ये एक्साईटमेंट हवी म्हणून त्याचा लूक गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. पण सेटवरच्याच काही लोकांनी लपून छपून त्याच्या लुकचे व्हिडीओ, फोटो व्हायरल केले.
ते पाहून प्रेक्षकांमद्धे या चित्रपटाबद्दल अजूनच उत्सुकता वाढलेली पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांत विकी कौशलच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे. हुस्न तेरा तौबा तौबा गाण्याची हुक स्टेप कॉपी करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे छावा चित्रपटासाठी पिळदार शरीर बनवण्यासाठी घेतलेली मेहनत, वाढवलेली दाढी पाहून अनेकांनी त्याला या भूमिकेसाठी योग्यच असल्याचे म्हटले होते . दरम्यान चित्रपटाच्या टीझरमध्ये विकी कौशल प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.