सध्या कला सृष्टीत लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिची हळद पार पडली. तर अभिनेता शाल्व किंजवडेकर, अभिनेत्री शिवानी सोनार, यांचीही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. अशातच अभिनेता प्रशांत निगडे यांच्याही लग्नाचा बार उडणार आहे. सध्या स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत तो ‘रॉकेट’ची भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्याचे हे पात्र मजेशीर असल्याने त्याची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. याअगोदर प्रशांत निगडे यांनी स्वाभिमान मालिकेत बबनचे पात्र साकारले होते.
त्यांच्या शून्य मिनिटाच्या डायलॉगमुळे ही भूमिका संस्मरणीय ठरली होती. लवकरच प्रशांत निगडे अभिनेत्री विरिशा नाईक सोबत लग्नगाठ बांधत आहे. विरिशा नाईक ही अभिनेत्री असून झी मराठीच्या तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेत ती ,’चंचला’चे पात्र गाजवत आहे. चंचला हे पात्र मालिकेत विरोधी भूमिका दर्शवत आहे. आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ या नाटकात दोघांनी एकत्र काम केले आहे. या नायकाचे लेखन ,दिग्दर्शन आणि निर्मिती देखील प्रशांत निगडे यांची आहे.
१५ ऑगस्ट रोजी प्रशांत निगडे आणि विरिशा नाईक यांचा साखरपुडा पार पडला होता. आता डिसेंबर महिन्यात ते दोघे विवाहबद्ध होणार आहेत. तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे बोलले जात आहे. लक्ष्मी निवास या मालिकेच्या आगमनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, किंवा मालिकेच्या प्रसारण वेळेत बदल होईल असेही म्हटले जात आहे. त्यामुळे तुर्तास तरी चंचला म्हणजेच विरिशा नाईक हिला लग्नानिमित्त मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घ्यावा लागेल.