‘द क्वीन ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातून चार सौंदर्यवती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ‘द क्वीन ऑफ द वर्ल्ड’ या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेक देशांतील सौंदर्यवती सहभागी होणार आहेत. यंदा या स्पर्धेत भारतातून महिलांचे चार गट सहभागी होत आहेत. या चार सदस्यीय संघात केवळ तरुणीच नाही तर एक ५३ वर्षांची सौंदर्यवतीही सहभागी झाली आहे हे विशेष. गेल्या सहा महिन्यांपासून मिस इंडिया, मिसेस इंडिया, एमएस इंडिया आणि एलाईट इंडिया अशा चार गटातील सौंदर्यवतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातून मिस इंडिया म्हणून आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याची कन्या ‘अबोली कांबळे’ भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. अबोली कांबळे ही परभणीचे सुप्रसिद्ध डॉ अनिल कांबळे यांची कन्या आहे.
या सौंदर्य स्पर्धेसाठी अबोलीची निवड करण्यात आल्याने परभणीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अबोलीला लहानपणापासूनच मॉडेलिंग क्षेत्रात येण्याचे वेध लागले होते. त्यादृष्टीने तिने अशा वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे. ‘द क्वीन ऑफ द वर्ल्ड’ हा आंतरराष्ट्रीय फॅशन शो आहे. ज्यामध्ये सौंदर्यवती वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सहभागी होतात. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ एप्रिल रोजी न्यूयॉर्क शहरात पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा लौकिक उंचावण्यासाठी महाराष्ट्राच्या मिस इंडिया म्हणून अबोली कांबळे, एमएस इंडिया म्हणून गायत्री दवे, मिसेस इंडिया म्हणून प्रिया सग्गी आणि एलाईट इंडिया म्हणून अमिता गोयल यांची निवड करण्यात आली आहे. या चारही सौंदर्यवती गेल्या ६ महिन्यांपासून अविरत मेहनत घेत आहेत. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी मॉडेलिंग हे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते, भारतातील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून या सौंदर्यवती विविध श्रेणींमध्ये मिस इंडिया बनल्या आहेत. त्यानंतर या चारही सौंदर्यवतींना आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
या सर्व स्पर्धकांची तयारी फॅशन जगतातील प्रसिद्ध चेहरा उर्मिला बरुआ यांनी केली आहे. भारतात वेगवेगळे फॅशन शो आयोजित करणे आणि त्यातून महिलांची आंतरराष्ट्रीय नियमांनुसार निवड करणे हे खूप अवघड काम आहे. अशा परिस्थितीत गेल्या ६ महिन्यांच्या तयारीनंतर या चार स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ही चार सदस्यीय टीम जेव्हा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विमानतळावर पोहोचली तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी हातात तिरंगा घेऊन त्यांचे स्वागत केले आणि विजयाच्या घोषणा दिल्या. हे चौघेही अमेरिकेतून विजयी होऊन परत यावेत अशी मनापासून प्रार्थना या चाहत्यांनी केली आहे.