शांती मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री आज आजारपणामुळे अभिनय क्षेत्रापासून बाजूला आहे. खरं तर ही अभिनेत्री हिंदी मालिका, चित्रपट सृष्टीत दमदार भूमिका साकारताना दिसली. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच अश्विनी कळसेकर होय. अश्विनी कळसेकर यांनी लहानपणी नृत्याचे धडे गिरवले होते. शांती मालिकेसाठी त्यांनी ऑडिशन दिली आणि त्यात त्यांची निवड करण्यात आली. जोधा अकबर, जॉनी गद्दार, कसम से, गोलमाल अगेन अशा अनेक कलाकृतीतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. १९९८ साली हिंदी मालिका अभिनेता नितेश पांडे सोबत त्यांनी लग्न केले. पण अवघ्या ४ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. २००९ साली मुरली शर्मा सोबत त्यांनी दुसरा संसार थाटला. पण आजारपणामुळे आता अश्विनी कळसेकर यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला आहे.

या आजारपणाबद्दल त्यांनी एक धक्कादायक खुलासा करताना म्हटले आहे की, “मला डाव्या बाजूला किडणीच नाहीए!….हे मला लहानपणापासूनच माहीत होतं. पण तरीही मला लहानपणी मुलांसारख्या बाईक चालवायला आवडायच्या. २००७ साली डॉक्टरांनी माझ्यावर चुकीची लेझर प्रोसेस केली, मला इन्फेक्शन असताना. तेव्हा २४ तासात ते इन्फेक्शन सर्व शरीरभर पसरलं. ‘नमस्कार यमराजा!’ असं मी म्हणून आले होते. डॉक्टरांनी सुद्धा सगळी आशा सोडून दिली होती. इतका वेळही नव्हता की त्या वेळात दुसरी किडणी ट्रान्सप्लांट करता येईल. ६ दिवस मी जागी होते आणि असंबंध बडबडत होते. अनेक उपाय केल्यानंतर मला दुसरं आयुष्य मिळालं. अनेक दिवस सकाळी, रात्री अशी रोज २ इंजेक्शन घ्यावी लागायची त्याच्या गाठी तयार झाल्या होत्या. त्यादरम्यान माझं वजन वाढू लागलं. हॉस्पिटलमध्ये उठून मी सेटवर जायचे तेव्हा एकता कपूर, कलाकारांनी खूप सांभाळून घेतलं.

आजही मी घरात राहून माझं आयुष्य छान जगते. या किडणीच्या आजारामुळे मी बाळाचाही विचार करू शकत नाही. त्यामुळे घरात दोन श्वान आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवते. माझा नवरा, सासू सासरे मला खूप सपोर्ट करतात आणि म्हणूनच मी वाढलेलं वजन आता कमी केलं आहे.” अभिनेत्री अश्विनी कळसेकर हिने मराठीसह हिंदी सृष्टीही गाजवली आहे, पण आता किडणीच्या विकारामुळे ती अभिनय क्षेत्रापासून थोडी दुरावली आहे. सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करिब मध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.



