
येत्या २५ एप्रिल रोजी सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपुक’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटासाठी सुरजचा विचार केला आणि त्यालाच या चित्रपटाचा नायक म्हणून घोषित केले. अर्थात हा चित्रपट सुरजच्या आयुष्याची कथा नसून एक सर्वसामान्य मुलाची कथा असल्याचे स्पष्टीकरण केदार शिंदे यांनी दिलं आहे. दरम्यान या चित्रपटाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण अभिनेत्री जुई भागवत सोबत स्क्रीन शेअर करताना दिसतो.

जुई भागवत ही सूरज चव्हाणच्या नायिकेची भूमिका साकारत आहे. पण जुई भागवत नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जुई भागवत हिला अभिनयाचे बाळकडू तिच्या आईकडूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही. कारण जुई भागवत ही प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवत यांची कन्या आहे. दीप्ती भागवत या केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका, निवेदिका, गायिका तसेच गीतकार आहेत. संगीतकार, गायक मकरंद भागवत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. जुईलाही लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे.

झी मराठीच्या ‘ महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिऍलिटी शोमध्ये जुईने सहभाग दर्शवला होता. इथूनच तिला तुमची मुलगी काय करते मालिकेत महत्वाची भूमिका मिळाली. एक दोन मराठी चित्रपटात झळकल्यानंतर आता जुई भागवत झापुक झुपुक चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाणची पहिली नायिका अशी तिची या चित्रपटामुळे नव्याने ओळख बनत आहे. चित्रपटाचे कथानक ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात आलेच आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा वाढलेली पाहायला मिळत आहे.