
अभिनेत्री साक्षी गांधी ही मूळची चिपळूणची. स्टार प्रवाहच्या अनेक मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील तिची अवनीची भूमिका प्रसिद्धीस आली होती. सध्या कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेत ती यमुना धर्माधिकारीची भूमिका साकारत आहे. साक्षी गांधी हिने कॉलेजमध्ये असतानाच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. चिपळूणच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा.
साक्षी गांधी हिने स्थानिक नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे ही चिपळूणची कन्या व्यावसायिक क्षेत्रात दाखल झाली. यातूनच तिला मालिका सृष्टीत विरोधी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. गेली सहा सात वर्षे साक्षी गांधी मराठी सृष्टीत काम करत आहे. दमदार भूमिकेमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. आता गिरीजा प्रभू हिची मुख्य भूमिका असलेल्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत ती विरोधी पात्र साकारताना दिसत आहे. मुंबईत स्ट्रगल सुरू असताना आणि एकटं राहताना अनेक अडचणींचा तिला सामना करावा लागला. हाताशी नवीन मालिका आणि अशातच आपल्या गावी हक्काचं घर पूर्ण झाल्याने साक्षीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

आपल्या गावात आपलं स्वतःच सर्व सुखसोयींनी युक्त एक टुमदार घर असावं असं गांधी कुटुंबाचं स्वप्न होतं. आता हे स्वप्न सत्यात उतरलेलं पाहून साक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या टुमदार घराची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. दारावरची आकर्षक नेमप्लेट, सफेद रंगाच्या थीममधील इंटेरिअर, नारळाची बाग आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं तिचं हे घर मन प्रसन्न करून जातं. या स्वप्नपूर्ती साठी साक्षी गांधी आणि कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन!.