२००९ साली प्रदर्शित झालेला थ्री इडियट्स हा चित्रपट फूनसुक वांगडू या नायकावर आधारित होता. या चित्रपटाचा नायक म्हणजेच खऱ्या आयुष्यातील सोनम वांगचुक हे एका वेगळ्या मागणीसाठी २१ दिवसांसाठी उपोषणाला बसले आहेत. पण कालच त्यांनी आपलं हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोनम वांगचुक हे लडाख मधील एस एन एम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. इथे माझी डॉक्टरांच्या टीम कडून योग्य ती काळजी घेतली जात आहे असे एक ट्विट ततानी केले आहे. ६ मार्च रोजी सोनम वांगचुक यांनी २१ दिवस उपोषणाला बसणार अशी घोषणा केली होती. काल २७ मार्च रोजी लडाखमधील २१ दिवसांचे उपोषण त्यांनी संपवलेले पहायला मिळत आहे.
परंतु काही दिवसांनी पुन्हा उपोषण सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. “मी लडाखसाठी संवैधानिक संरक्षण आणि लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढत राहीन,” असे ते यावेळी म्हणाले. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लेह आधारित ॲपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांच्या संयुक्त प्रतिनिधींमधील चर्चेनंतर ६ मार्च रोजी ‘क्लायमेट फास्ट’ सुरू करण्यात आले होते. सोनम वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, स्थानिक लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, लेह आणि कारगिलसाठी प्रत्येकी एक संसदीय जागा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. एकीकडे चित्रपटाचा हा खरा नायक विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेला असताना दुसरीकडे 3 इडियट्स चित्रपटाचे रियुनियन पाहून मात्र लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
होळीच्या निमित्ताने 3 इडियट्स चित्रपटाची टीम एकत्र जमली होती. यावेळी स्वानंद किरकिरे, शरमन जोशी, गायक शान , लकी अली यांनी 3 इडियट्स चित्रपटाची गाणी गात हा सण साजरा केलेला पाहायला मिळाला. पण एकीकडे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले असताना एकाही कलाकाराला त्यांची विचारपूस करण्याची आठवण राहिली नाही अशी त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या कलाकारांनी असे रियुनियन करताना त्यांची आठवण ठेवायला हवी होती. लडाखला जाऊन त्यांची भेट का नाही घेतली? असेही प्रश्न त्यांना आता विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान २१ दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर ते पुन्हा उपोषणाला बसतील असे त्यांनी ट्विट केले आहे.