अभिनेत्री स्नेहा चव्हाण आज मानस सोबत विवाहबद्ध झाली आहे. या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळतात. स्नेहा चव्हाण हिने लाल ईश्क, सिनिअर सिटीझन, ७०२ दीक्षित अशा चित्रपटातून काम केले होते. २०२१ साली घरगुती हिंसाचार प्रकरणी पहिला नवरा अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपला मानसिक छळ केला जातोय, मारहाण केली जातेय असे आरोप तिने अनिकेत विश्वासराववर लावले होते. अनिकेत विश्वासराव हा देखील अभिनेता आहे. त्याने पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, बस स्टॉप, बघतोस काय मुजरा कर अशा चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटात एकत्रित काम करत असताना स्नेहा सोबत त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. २०१८ साली दोघांनी मोठ्या थाटात लग्नही केले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान स्नेहा पुण्यात आपल्या आईकडे राहत होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये स्नेहाने अनिकेत विरोधात तक्रार दाखल केली. अनिकेत पेक्षा आपण वरचढ ठरतोय म्हणून तो आपल्याला मारहाण करतो आणि मानसिक छळ करतो असे तिने आरोपपत्रात म्हटले होते. त्यानंतर स्नेहाने केवळ पोटगी मिळवण्यासाठी हा बनाव रचला असे अनिकेतने एका मुलाखतीत म्हटले होते. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे आणि त्याची प्रोसेस सुरू आहे असे तो त्यावेळी म्हणाला होता.
अखेर दोन वर्षांनंतर म्हणजेच जून २०२३ रोजी कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला. या बंधनातून आता आपली सुटका झाली असे म्हणत स्नेहाने त्यावेळी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता स्नेहाने पुन्हा एकदा संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. स्नेहा आणि मानस हे दोघेही आज विवाहबद्ध झाले असून सेलिब्रिटींनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.