सत्यम शिवम सुंदरा, मेंदीच्या पानावर, बिलनशी नागीण निघाली ही आणि अशी अनेक चित्रपट गीतं, भाव गीतं, भजन, लोकगीतं गाऊन उत्तरा केळकर यांनी स्वतःची गायन क्षेत्रात ओळख बनवली आहे. लहान असतानाच उत्तरा केळकर यांनी आईकडून गायनाचे धडे गिरवले होते. पंडित फिरोज दस्तुर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. आर्किटेक्ट असलेल्या विश्राम केळकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. ज्येष्ठ अभिनेते अजित केळकर हे विश्राम केळकर यांचे भाऊ. त्यामुळे घरात गायन आणि अभिनय अशा कलेचा सहवास लाभला. उत्तरा केळकर यांनी अनेक भाषेतून गाणी गायली आहेत. पण हिंदी सृष्टीत त्यांच्या वाट्याला कमी गाणी आली अशी त्यांची एक खंत आहे. बिलनशी नागीण निघाली, कोळीगीतं, लावणी अशा एकाच पठडीतल्या गाण्यांची त्यांच्याकडे रेलचेल सुरू झाली तेव्हा त्या गोष्टीचा त्यांना कंटाळा येऊ लागला.
बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांचे त्यांनी सादरीकरण केले तेव्हा त्यांचे मोठे कौतुक झाले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीनेही कला क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री गायिका मानसी केळकर ही उत्तरा केळकर यांनी लेक आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. मानसीने लहान असल्यापासूनच गाण्याचे धडे गिरवले होते. अशोक पत्की यांच्याकडे तिने सुगम संगीत शिकले होते. रुपारेल कॉलेजमध्ये असताना मानसीने अभिनयाची वाट धरली. नाटक, एकांकिका स्पर्धा सुरू असतानाच तिला व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. मालिकेतूनही ती सक्रिय झाली. कॉलेजचाच मित्र कौस्तुभ तांबे याच्याशी तिने प्रेमविवाह केला. मुलाच्या जन्मानंतर मात्र मानसी गायन क्षेत्राकडे वळली.
हौशी गायकांसाठी तिने ‘स्वरमानसी’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अवघ्या तीन वर्षांची मुलं ते अगदी वृद्धांपर्यंत हौशी गायक तिच्या या संस्थेशी जोडले गेले. मानसीने यातच करिअर करत हौशी गायकांना एकत्रित केले. विविध ठिकाणी जाऊन तिने कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. या प्रवासात मात्र तिला टोमणेही खावे लागले. उत्तरा केळकर या प्रसिद्ध गायिका असूनही तू तेवढे यश मिळवू शकली नाहीस असे तिला म्हणण्यात येऊ लागले. एक अभिनेत्री म्हणून आणि गायिका म्हणून मानसीला अपयश मिळाले . पण या सर्वांना तिने स्वरमानसीच्या यशातून चोख उत्तर दिलेले पाहायला मिळाले.