नवऱ्याकडून पैसे घेऊन त्या चित्रपटाची निर्मिती केली पण मोठं नुकसान झालं आणि पूर्णपणे खचून गेले ४ ते ५ वर्ष

आयुष्यात सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. आपण कितीही मेहनत घेऊन ती गोष्ट केली असेल तरीही नशिबाने साथ दिली नाही तर सर्व मेहनत व्यर्थ जाते आणि मग उरत ते नैराश्य. अशीच गोष्ट अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या बाबतीत देखी घडली. अशी ही बनवाबनवी, हळद रुसली कुंकू हसलं, धडाकेबाज, कळत नकळत, एक रात्र मंतरलेली, वजीर अशा कित्तेक चित्रपटातून अश्विनी भावे यांनी दमदार अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख जपली. खरं तर कुठलीही पार्श्वभूमी नसताना अश्विनी भावे यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा नाटकातून त्या मंचावर सहजतेने वावरत असत. अशातच राजलक्ष्मी चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. वजीर चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच उल्लेखनीय ठरली होती.

सैनिक, जखमी दिल, अशांत, बंधन, भैरवी अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनयाची कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच लग्न करून घर संसार सांभाळावा ही त्यांची ईच्छा पूर्ण झाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या किशोर बोपर्डीकर सोबत विवाहबद्ध होऊन सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाल्या. दोन मुलं, त्यांचे पालनपोषण अशी जबाबदारी पार पाडत असताना निर्मिती क्षेत्रात उतरावं असे त्यांनी मनाशी पक्कं केलं. २००७ सालच्या कदाचित या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. चित्रपटासाठी अश्विनी भावे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भारतात आल्या होत्या. चार महिन्यांसाठी त्यांनी आपल्या मुलांना इथल्याच शाळेत प्रवेश घेतला होता.

अमेरिकेतील आणि इथल्या अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यायला मुलांना अडचणी जाणवत होत्या. चित्रपट प्रदर्शित झाला, कथानकाचे मोठे कौतुकही झाले. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. यामुळे अश्विनी भावे यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी नवऱ्याकडून पैसे घेतले होते, मात्र चित्रपटाच्या अपयशामुळे अश्विनी भावे खूपच खचून गेल्या. त्यानंतर तीन चार वर्षे त्यांनी अभिनय देखील केला नव्हता. हे क्षेत्र आपलं नाही असा त्यांनी कानाला खडा लावला. नवनवीन प्रयोग करणं अश्विनी भावे यांना नेहमीच आवडतं. त्यानंतर कालांतराने अभिनय क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाल्या. मधल्या काळात त्यांनी छानशी बाग बनवली. या बागेत फळझाडं, भाजीपाला यांचं पीक घेतात. त्यांच्या या विस्तारलेल्या बागेची भुरळ चाहत्यांना नेहमीच पडते.