हे नाव कमावण्यासाठी खूप झिजावं लागलंय, कृपा करून चुकीच्या अफवा पसरवू नका…१० वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याबद्दल श्रेयस तळपदेचं आवाहन

अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर नुकताच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी श्रेयस तळपदे आणि इतर १४ जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या चिट फंड मध्ये गावकऱ्यांनी अल्पावधीत दामदुप्पट मिळण्याच्या अमिषापोटी कोट्यवधी रुपये गुंतवले होते. या गुंतवणुकीला आता १० वर्षे उलटून गेली आहेत पण तरीही परतावा मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी कंपनी विरोधात हा निर्णय घेतला आहे.
दहा वर्षांपूर्वी या चिट फंड कंपनीच्या एजंटने गावकऱ्यांना दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले होते. पण अद्यापपर्यंत या ग्रामस्थांना त्याचक परतावा देखील मिळालेला नाही. त्यामुळे या कंपनीशी निगडित असलेल्या श्रेयस तळपदे आणि इतर १४ जनांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र यावर श्रेयस तळपदेचे म्हणणे वेगळे आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्याच्या टीमने म्हटले आहे. श्रेयस तळपदे हे एक मोठं नाव आहे. हे नाव कमावण्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली आहे. त्याच्याबद्दल ही चुकीची माहिती पसरवली जात आहे.

एक सेलिब्रिटी म्हणून तो कार्पोरेट क्षेत्राशी जोडला गेला आहे. तिथे त्याला आमंत्रण दिले जाते. अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्याचे नाव या फसवणुकीची गोवले जात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत श्रेयस तळपदेला अडकवलं जात आहे असं श्रेयस तळपदेच्या टीमचं म्हणणं आहे. माझा या गोष्टीशी काहीही संबंध नाही, कृपा करून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्याने सोशल मीडियावर केले आहे.