रसिक प्रेक्षकांची मी माफी मागतो की या अशा अवस्थेत…बीड मधील नाट्यगृहाची अवस्था पाहून शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली खंत

१६ फेब्रुवारी रोजी बीड मध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला काही मोजके जाणकार प्रेक्षक वर्ग तसेच नाट्यपरिषदेचे पदाधिकारी आणि उपायुक्त हेही उपस्थित होते. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर शरद पोंक्षे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. रसिक प्रेक्षकांची माफी मागून त्यांनी इथून पुढे मी तरी या नाट्यगृहात प्रयोग करायला येऊ शकत नाही अशी एक खंत त्यांनी बोलून दाखवली. या प्रकरणाबद्दल सविस्तरपणे सांगताना शरद पोंक्षे म्हणतात की, ” आम्ही या नाटकाचा प्रयोग कसाबसा पूर्ण केला. नाट्यगृहात कुठलीही स्वच्छता नाही. महिला जाऊ शकणार नाहीत अशी इथल्या टॉयलेटची अवस्था आहे. आम्ही स्वतः स्वच्छता करण्यासाठी एक माणूस आणला.
मेकअप रूममध्ये तर एक साधा बल्बदेखील नाही. अशा अवस्थेत आम्ही या नाटकाचा प्रयोग केला आहे. मी दीड तास हे मनात दाबून ठेवलं होतं पण समोर बसलेले नाट्यपरिषदेचे पदाधिकारी यांच्यापर्यंत मला हे बोलून दाखवायचं होतं. इथल्या कर्मचाऱ्यांना गेले वर्षभर पगार मिळाला नाही. रसिक प्रेक्षकांची मी माफी मागतो, की या अशा अवस्थेत कोण नाटक करायला येईल?. मला असं वाटतं एक वर्षाने इथे नाट्यप्रयोग होत असावा. दोन वर्षांपूर्वी शेवटचं नाटक प्रशांत दामले यांनी केलं होतं. ते सोडा इथे नाट्यगृह बांधलंय आणि तिकीट विंडोच नाहीए. बाहेर खुर्चीवर बसून तिकीट द्यावं लागतंय अशी भयंकर परीस्थिती इथे पाहायला मिळत आहे.
साहेब तुम्ही आलाय म्हणून मी हे बोलतोय, एक कळकळीची विनंती आहे की यापुढे हे जोपर्यंत सर्व व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझं शरद पोंक्षेचं नाटक मी इथे करणार नाही , माफ करा रसिकहो पण मी नाही करू शकत”…..शरद पोंक्षे यांनी खंत व्यक्त करत असताना उपस्थितांमधून एक आवाज आला की, ” दोन वर्षाने इथे नाटकाचा प्रयोग होत आहे. साहेब १० महिने झाले इथल्या कामगारांना पगार दिला गेला नाही….नाट्यगृहातच नाही तर बीड शहरात देखील कुठलीही स्वच्छता नाही”. प्रेक्षकांमधून आलेले हे आवाज पाहून सगळेचजण स्तब्ध झाले. नाट्यगृहाचा गलथान कारभार पाहून शरद पोंक्षे नाराजी व्यक्त करताना दिसले त्याच बाजूला प्रेक्षकांनीही त्यांच्या मनातली ही खंत बोलून दाखवली. दरम्यान नाट्यपरिषदेचे पदाधिकारी यावर गंभीरतेने विचार करतील अशीअपेक्षा व्यक्त केली जात आहे.