आपल्या रोखठोक बोलण्यामुळे तसेच सहजसुंदर अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या सविता मालपेकर यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मुलगी झाली हो, गाढवाचं लग्न, मुळशी पॅटर्न अशा माध्यमातून सविता मालपेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या आहेत. सविता मालपेकर या लग्नानंतरही माहेरचेच आडनाव लावतात. चार भावंड आई वडील असे त्यांचे सुखी कुटुंब होते. पण सविता मालपेकर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे चार भावंडांची पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. खूप कमी वयातच सविता यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी, शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली होती. सविता मालपेकर यांच्या आईचे वडील मुंबईतील काळा चौकी येथे सोन्या चांदीचे व्यापारी होते. त्यामुळे घरात अगदी सोन्याचा धूर निघावा अशी त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम होती. त्याकाळात सविता मालपेकर यांच्या आईवडिलांनी प्रेमविवाह केला होता.
लग्नानंतर काही वर्षाने हे मालपेकर कुटुंब राजपुरला स्थायिक झाले. त्याकाळात अनेक कलाकार मंडळी चहापाण्याला मालपेकर कुटुंबाकडे येत असत. अशातच त्यांच्या वडिलांची आणि राजा गोसावी यांची मैत्री झाली होती. सविता मालपेकर यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी राजा गोसावी यांना कळली तेव्हा त्यांनी सविताला नाटकात काम करण्याची संधी देऊ केली. ‘डार्लिंग डार्लिंग’ हे सविता मालपेकर यांचं पहिलं व्यावसायिक नाटक. याअगोदर रत्नागिरी येथे त्या नाटकातून काम करायच्या तेव्हा त्यांना ३५ रुपये मिळायचे. राजा गोसावी यांच्या नाटकानिमित्त त्या मुंबईत गेल्या. राजा गोसावी, नयना आपटे, अशोक सराफ अशा मोठ्या कलाकारांसोबत त्यांना स्टेजवर उतरण्याची संधी मिळाली. नाटकातून काम केल्यानंतर मिळाले पैसे त्या घरखर्चासाठी गावी पाठवत असत. त्यामुळे रोजचे जीवन जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू असायची. अशातच मुंबइला आल्यानंतर काही दिवस त्या मामाकडे राहिल्या. पण आजोबा आणि नंतर मामाचेही निधन झाले तेव्हा त्यांना मुंबईत राहण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागला. मावशी मुंबईलाच असल्याने काही काळ त्यांचा आधार मिळाला. गावी घरखर्चाला पैसे देता यावे म्हणून सविता मालपेकर सकाळचा नाश्ताच करत नव्हत्या. त्याकाळातील अनेक कलाकार मंडळी एकमेकांना समजून घेत असत. नाश्ता ,जेवणाला सगळ्यांना सोबत घेत असत. भक्ती बर्वे, सदाशिव अमरापूरकर यांना त्याची जाणीव झाली तेव्हा ते सविताला उठवून नाश्ता करायला नेत असत. पण ही मंडळी आज उद्या आपल्याला खाऊ घालतील आपल्याला किमान एक दिवस तरी त्यांना खाऊ घालावे लागेल या विचाराने त्यांनी एक युक्ती काढली.
त्यावेळी कोणी आपल्याला बोलावू नये म्हणून आणि भूक लागू नये म्हणून त्या झोपेच्या गोळ्या खायच्या. कंपोज नावाच्या झोपेच्या गोळ्या त्यावेळी २ रुपयाला १० गोळ्यांचं पाकिट मिळायचं. ते खाऊन त्या सकाळचा नाश्ता स्कीप करायच्या. नाटक, चित्रपट, मालिका अशा माध्यमातून त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली, कामाचे चांगले पैसे मिळू लागले. चार भावंडांना त्यांच्या पायावर उभं केलं ,त्यांची लग्न लावून दिली. या सर्वात आई आणि मावशीची मोठी साथ मिळाली. शिवाय नावऱ्याचीही साथ तेवढीच महत्वाची असते. राजीव राणे हे सविता मालपेकर यांच्या नवऱ्याचे नाव. तर मुलगी केतकी राणे हिनेही आईला नेहमीच साथ दिली आहे. या सर्वांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले असे त्या आवर्जून सांगतात. सविता मालपेकर या मराठी इंडस्ट्रीत अन्नपूर्णा म्हणूनही ओळखल्या जातात. सेटवर सगळ्यांना खाऊ घालणे हे त्यांच्या आवडीचे काम. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता मदत करणे हे मी माझ्या वडिलांकडून शिकले अशी त्या आठवण सांगतात.