“गणोजी शिर्के यांनी वाट दाखवल्याचा पुरावा द्या अन्यथा… ” छावा चित्रपवरून शिर्के वंशजांचा थेट आक्षेप

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची एकच चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण आता या चित्रपटाच्या बाबतीत शिर्के वंशजाने आक्षेप घेत दिग्दर्शकाला थेट इशारा दिला आहे. छावा चित्रपटात गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठाव ठिकाणा दाखवला आहे. पण यावर शिर्के वंशजाने आक्षेप घेत त्याचे पुरावे लक्ष्मण उत्तेकर यांना मागितले आहेत. गणोजी शिर्के यांनी वाट दाखवल्याचे पुरावे द्या अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराच त्यांनी छावा कादंबरीचे प्रकाशक आणि दिग्दर्शकाला दिलेला आहे.
शिर्के वंशजाचा वारसा लाभलेले दीपक शिर्के यांनी या चित्रपटाबद्दल आक्षेप नोंदवताना म्हटले आहे की, ” हा चित्रपट दाखवण्याआधी आमच्याशी बोलायला हवं होतं. चित्रपटात इतिहासाची मोडतोड केलीय, आमच्या घराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. ज्यांनी कादंबरी लिहिली त्यांनीही कधी आमच्या घराण्याची भेट घेतली नाही.राजेशिर्के घराण्याने खूप मोठे योगदान दिले आहे.

आम्ही गद्दारी केली असे कुठलेच पुरावे नसताना केवळ सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. आम्हाला खलनायक दाखवून एक चुकीचा इतिहास समोर मांडण्यात येत आहे.” असे म्हणत दीपक शिर्के यांनी या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवला आहे. छावा कादंबरीचे प्रकाशक तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यावर गुन्हा नोंदवणार असेही त्यांनी म्हटले आहे.