झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील सिंबा म्हणजेच बालकलाकार साईराज केंद्रे आता दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे पुन्हा शूटिंगसाठी सेटवर परतला आहे. पण दिवाळीच्या दिवसात कुटुंबासोबत आणि विशेष म्हणजे आईसोबत वेळ घालवणारा सिंबा आता आईला सोडून जाताना भावूक झाला आहे. गेले काही दिवस साइराज मालिकेचे शूटिंग आटोपून दिवाळीच्या सुट्टीला त्याच्या घरी गेला होता. दिवाळीचा फराळ, फटाके, धमाल, माजमस्ती केल्यानंतर आता तो पुन्हा मालिकेत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पण यामुळे आईपासून आपल्याला दूर जावे लागणार या भावनेनेच त्याला रडू कोसळले आहे. पाठीवर बॅग घेऊन निघण्यासाठी तयार झाल्यानंतर साइराज आईची गळा भेट घेतो. तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. त्याचा हा भावुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. घाबरलीस ना आई या साजेशा गाण्यावर साइराजचे वडील गणेश केंद्रे यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. शूटिंगवेळी सेटवर साइराजचे वडील नेहमी हजर असतात. पण तस्स आपल्याला आईपासून लांब राहावं लागणार ही गोष्टच त्याला गहिवरून टाकणारी ठरली आहे. अर्थात साइराज अजून खूप लहान आहे त्यामुळे हे हळवे क्षण पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.
साईराज केंद्रे हा सिंबाच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय झाला आहे. एक रीलमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला हा साइराज मालिकेतही गाजला. खरं तर मालिका संपण्याच्या मार्गावर होती पण सिंबाची एन्ट्री प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यात यशस्वी ठरली. या चिमुरड्यामुळे सेटवर खेळीमेळीचे वातावरण असते. त्याचमुळे साईराजने त्याच्या निरागसपणाने सगळ्यांना आपलंसं केलं आहे.