गोव्यातून मुंबईत आले ऑर्केस्ट्रा सुरू केला ज्यात पत्नी… सचिन पिळगावकर यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास आठवणी
सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अर्थात वडीलांचे पाठबळ असल्यानेच या क्षेत्रात यश मिळवणं त्यांच्यासाठी सोपं गेलं. फक्त एक अभिनेता म्हणून न राहता त्यांनी, दिग्दर्शक, गायक, निर्माता म्हणूनही यश मिळवलं आहे. सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. ते मूळचे गोव्याचे पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुरू केला. ज्यात ते स्वतः गायचे आणि पत्नीलाही गायला लावायचे. यातून पुढे सचिन पिळगावकर यांनाही अभिनय आणि गाण्याची आवड निर्माण झाली.
पुढे हिंदीत यश मिळवल्यानंतर मराठीतही त्यांनी नायक म्हणून लोकांसमोर यावं अशी शरद पिळगावकर यांची इच्छा होती. अष्टविनायक हा चित्रपट सचिनने दिग्दर्शित करावा आणि त्यात नायक म्हणूनही काम करावे असे त्यांनी मत व्यक्त केले. हा चित्रपट आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटानंतर काही वर्षातच शरद पिळगावकर यांचे निधन झाले. पण त्यानंतर तर सचिन पिळगावकर यांचा मराठी चित्रपट दिग्दर्शनात हातखंडाच बनलेला दिसून आला. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन त्यांनी अनेक अजरामर चित्रपट या सृष्टीला मिळवून दिले.
शरद पिळगावकर यांचे नाव मागे असल्याने सचिन पिळगावकर यांना हे यश मिळवणं सोपं झालं. आज ६ जानेवारी शरद पिळगावकर यांचा जन्मदिवस. वडिलांच्या आठवणीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शरद पिळगावकर आणि सचिन पिळगावकर या बाप लेकाच्या दिसण्यात बरचसं साम्य तुम्हाला जाणवेल. वडिलांचा मुलीवर खूपच जीव होता असं त्यांची पत्नी नेहमी म्हणतात. कुठेही बाहेर जाताना सचिनपेक्षा सचिनच्या बहिणालाच बाहेर फिरायला घेऊन जायचे असं त्या सांगतात.