‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडली दुर्दैवी घटना… मदतकार्य वेगवान होण्यासाठी रितेश देशमुखचा पुढाकार

संगम माहुली मंदिर, सातारा येथे रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या “राजा शिवाजी” या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. दोन दिवस इथे शूटिंग पूर्ण करण्यात आलं पण दुसऱ्या दिवशीचे पॅक अप झाल्यानंतर सगळे कलाकार हॉटेलकडे परतले यातील काही कलाकार मात्र जवळ असलेल्या नदी पात्रात पोहण्यासाठी थांबले होते. यातील डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा नदी पात्रात उतरला मात्र दुर्दैवाने तो हरवल्याचे इतरांना समजले.
ही गोष्ट चित्रपटाच्या टीमला ताबडतोब कळवण्यात आली तेव्हा रितेश देशमुखने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोरिओग्राफर रेमो डिसुझा हे देखील घटनास्थळी पोहोचले. जराही विलंब न करता रितेश देशमुखने स्थानिक प्रशासन तसेच जिल्हाधिकारी पाटील यांना विनंती करून शोधकार्य तातडीने करण्याची विनंती केली. सौरभ शर्मा याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर सौरभ शर्मा यांच्या कुटुंबियांशी चित्रपटाच्या टीमने संपर्क साधला असून शोधकार्य सुरू असल्याची माहिती दिली.

मुंबई फिल्म कंपनीकडून यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. शोधकार्य अजूनही सुरू आहे. आणि चित्रपटाची टीम देखील सहकार्य करत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रपटाचे शूटिंग काही दिवस स्थगित करण्यात आलं असल्याचं मुंबई फिल्म कंपनी कडून सांगण्यात आलं आहे.