बंध रेशमाचे मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री करणाऱ्या रेश्मा शिंदे हिने नांदा सौख्यभरे मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती. लगोरी, रंग माझा वेगळा या मालिकेने तिला नायिका म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. सध्या स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ती जानकीची मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकेत काम करत असतानाच रेश्माने आता व्यवसाय क्षेत्रातही नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. मराठी इंडस्ट्रीतील बहुतेक अभिनेत्रींनी साड्यांचा, ड्रेसचा तसेच हॉटेल व्यवसायचा ब्रँड सुरू केलेला आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अक्षया देवधर हिने भरजरीनाम या नावाने साड्यांचा ब्रँड सुरू केला. पण रेश्मा शिंदे ने कपड्यांच्या ब्रॅंडकडे न वळता ज्वेलरी आणि घडाळाचा व्यवसाय सुरू केला आहे. “Palmonas” या ब्रॅंडशी तिने पार्टनरशिप केली आहे. “अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत. आत्ता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असुदे.” म्हणत रेश्माने तिच्या व्यवसाय पदार्पणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान अभिनय क्षेत्राच्या जोडीला वेगवेगळ्या माध्यमातून कलाकारांचं अर्थार्जन चालू आहे. हॉटेल व्यवसाय, निर्मिती संस्था, ज्वेलरी ब्रँड, कपड्यांचा ब्रँड, सलून अशा क्षेत्रात कलाकारांनी चांगला जम बसवला आहे. तर कोणी राजकारणाची वाट धरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मराठी कलाकारही आता त्यांच्या भविष्याची तरतूद करू लागलेले आहेत. खरं या गोष्टींचे कौतुक करायलाच हवे. नाहीतर वृद्धापकाळात पैशांअभावी अनेक कलाकारांनी खस्ता खाल्लेल्या पहायला मिळतात.