तो आपल्यात नसणं हा मोठा लॉस आणि याचं कारण तो स्वतःच आहे…पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली खंत
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले होते. टूरटूर हे नाटक पुरुषोत्तम बेर्डे यांनी रंगमंचावर आणलं आणि प्रेक्षकांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतलं. या नाटकानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांनी हमाल दे धमाल, शेम टू शेम, एका पेक्षा एक, हाच सूनबाईचा भाऊ असे चित्रपट लक्ष्मीकांतला घेऊन केले. नुकत्याच दिलेल्या सिनेमागल्लीच्या मुलाखतीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी अनेक खुलासे केलेले पाहायला मिळाले. दुसऱ्यांच्या मर्जीप्रमाणे चित्रपट बनवण्यापेक्षा मी स्वतःचे चित्रपट माझ्या मनाप्रमाणे घडवले असे ते म्हणतात. वर्षा उसगावकर असो किंवा लक्ष्मीकांत बेर्डे दोघांनी मला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पण निर्मात्यांची बाजू न आवडल्याने मी ते चित्रपट करण्याचे नाकारले असे ते स्पष्टपणे सांगतात. त्या काळात मराठी इंडस्ट्रीत चित्रपट निर्मात्यांना फारसे पैसे मिळत नव्हते. डिस्ट्रिब्युटर्स सांगतील तसं काम करावं लागायचं.
पण महेश कोठारे आणि अलका कुबल यांनी त्यांचे चित्रपट स्वतः प्रमोट केले होते हे मी स्वतः पाहिलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांचं आयुष्य स्वतः संपवलं अशी एक खंत ते इथे बोलून दाखवतात. याबद्दल ते म्हणतात की, ” लक्ष्मीकांतला मी लहानपणापासून ओळखतो. तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. कोणाच्या हाताखाली राहायचं हा त्याचा प्रांतच नव्हता. लक्ष्मीकांतला मी कधीच सांगू शकलो नाही की तू ह्या ह्या गोष्टींपासून लांब राहा. त्याला सुपरस्टार पद मिळालं आणि त्याने ज्या पद्धतीने त्याच लाइफस्टाइल बदललं त्या गोष्टीपासून त्याला लांब जाण्यासाठी अध्यात्माची गरज होती. त्याला ते कसं सांगावं हे मला कळत नव्हतं. या क्षेत्रात तुम्हाला अध्यात्म अत्यंत महत्वाचं आहे. अहंकारावर ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला हा मार्ग निवडायला हवा. त्याने जर त्याच्या बायकोचं प्रियाचं सुद्धा ऐकलं असतं …एक मोठं उदाहरण सांगतो निवेदिता ही अशोक सराफ यांचं सगळं लाईफ प्लॅन करते.
शरीर हे तुमचं माध्यम आहे लोकांसमोर येण्याचं तेच जर तुम्ही नाही सांभाळलं तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार. फोटोला महाराष्ट्र भूषण, पद्मश्री मिळणार नाही मरणोत्तर मिळतात पण ते सैनिकांना मिळतात. तुम्हाला कोणीतरी सांगणारा पाहिजे आणि त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे. लक्ष्मीकांत स्वतः डिसीजन मेकर होता. कुठलाही निर्णय तो स्वतः घ्यायचा. मी एक भाऊ मित्र म्हणून नाही तर त्याच्या सख्ख्या भावांना सुद्धा तो सरेंडर झाल्याचं मला नाही कळलं. त्याला सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जे व्हायचं ते झालं. आपण एका मोठ्या गोष्टीला मुकलो. त्याने शेवटच्या दिवसात सिरीयस नाटक करायचं बोलून दाखवलं. सर आली धावून त्याने हे नाटक केलं. तो आपल्यात नसणं हा मोठा लॉस आहे आणि याचं कारण तो स्वतःच आहे.”