हास्यजत्रेच्याच कलाकाराने अशी जुळवून आणली होती पहिली भेट…११ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रेमाचा किस्सा
२५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप प्राजक्ता वायकुळसोबत विवाहबद्ध झाला. खरं तर त्याच्या या अचानकपणे झालेल्या लग्नाच्या बातमीमुळे सगळेचजण अवाक झाले होते. पण गेली ११ वर्षे पृथ्वीक आणि प्राजक्ता प्रेमात असलेले पाहायला मिळाले. ३० ऑक्टोबर २०१३ मध्ये या दोघांची पहिली भेट घडून आली ती हास्यजत्रेच्याच प्रसिद्ध कलाकारामुळे. हा कलाकार म्हणजेच अभिनेता प्रसाद खांडेकर होय. प्रसाद खांडेकर यांचा एक नाटकाचा ग्रुप होता. प्रसाद खांडेकर एकांकिका बसवायचे. त्यावेळी प्राजक्तालाही नाटकातून काम करण्याची आवड होती. प्रसाद खांडेकर यांच्या घराजवळच प्राजक्ताचे घर होते. त्यामुळे एका एकांकिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी तिची निवड केली होती.
तर गौरव मोरे हा मुख्य भूमिकेत होता. पण काही दिवसांनी गौरव मोरेला एका व्यवसायिक नाटकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हा गौरवने ही एकांकिका सोडली. प्रसाद आणि पृथ्वीकचा मोठा भाऊ दोघेही मित्र, त्यामुळे पृथ्वीक या एकांकिकेत काम करेल का? असे प्रसादने विचारले तेव्हा पृथ्वीक ही एकांकिका करायला एका पायावर तयार झाला. ३० ऑक्टोबर २०१३ मध्ये त्याने ही एकांकिका करायला सुरुवात केली तेव्हा प्राजक्तासोबत त्याची पहिली भेट झाली. प्राजक्ता अबोल, ती फारशी बोलायची नाही, जेवढं उत्तर असेल तेवढंच ती बोलायची , तिचा हाच स्वभाव पृथ्वीकला खूप आवडला आणि तो तिच्या प्रेमातच पडला. मग दोन ते तीन महिन्यांनी पृथ्वीकने प्राजक्ताला डायरेक्ट लग्नाची मागणीच घातली. काही वेळाने प्राजक्तानेही तिचा होकार कळवला. कारण आजवर तिला अनेक मुलांनी प्रपोज केलं होतं पण लग्नासाठी मागणी घालणारा पृथ्वीक पहिलाच मुलगा होता म्हणून तिनेही जास्त वेळ न घेता तिचा होकार कळवला.
अर्थात ही गोष्ट पृथ्वीकने लगेचच घरी जाऊन त्याच्या आईला सांगितली होती. लग्न होईपर्यंत या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले, कधी कधी तर वाद इतका विकोपाला गेला की सगळं नातं सम्पवावं असा टोकाचा विचारही झाला. पण वादानंतर एक शांतता येते त्यात सगळा राग दूर व्हायचा आणि ते पुन्हा एकत्र यायचे. खरं तर प्राजक्ताचे तिच्या सासुसोबत लग्नाअगोदरच छान सूर जुळले होते. पृथ्वीक पेक्षाही प्राजक्ताने त्यांची काळजी घेतली होती, फिरायला नेले होते. अखेर ११ वर्षांनी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी दोघांनी लग्न केले. कुठल्याही प्रकारचा पैशांचा अपव्यय न करता हा पैसा त्यांनी २ मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी लावणार असे जाहीर केले तेव्हा सगळ्यांनीच त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.