गेल्या अनेक दिवसांपासून प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आज अखेर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या दोघांनीही मोठ्या थाटात लग्नगाठ बांधून चर्चेला पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन येथे प्रथमेश परब आणि क्षितिजाने ही लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही आपल्या गावी गेले होते. तिथेच त्या दोघांनी प्रिवेडिंग फोटोशूट करून घेतले होते. दोन दिवसांपूर्वी क्षितिजाने मेंदीचा सोहळा साजरा केला. शेवटी तुझ्या नावाची मेंदी हातावर सजली असे म्हणत क्षितिजाने प्रथमेशला टॅग केले होते. २४ फेब्रुवारी रोजी आम्ही लग्नगाठ बांधतोय असे या दोघांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या घरी लगीनघाई पाहायला मिळाली.
हळदीच्या सोहळ्यात अक्षय केळकरने हजेरी लावली होती तेव्हा अक्षयने प्रथमेशला खांद्यावर घेऊन गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. पारंपरिक पद्धतीने या दोघांची हळद पार पडल्यानंतर आज त्यांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला. यावेळी प्रथमेशने धोती कुर्ता असा पेहराव केला होता तर क्षितिजाने पिवळ्या गुलाबी रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती. मंगलाष्टका झाल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांनी सजलेल्या माळा घातल्या. तेव्हा क्षितिजा प्रथमेशच्या पाया पडली. तर क्षितिजाच्या गळ्यात माळ घातल्यानंतर प्रथमेश देखील तिच्या पाया पडला. दोघांच्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. आणि त्या कृतीमुळे दोघांचेही कौतुक देखील केले गेले.
गेली चार वर्षे क्षितिजा आणि प्रथमेश एकमेकांना डेट करत होते. एवढी वर्षे एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांना दिलेली साथ सांभाळत आज ते या लग्नाच्या निर्णयापर्यंत घेऊन पोहोचले आहेत. प्रथमेशने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीत एक वेगळी छाप पाडली आहे. तगडा, देखणा नायक या इमेजला बाजूला सारत असाही नायक असू शकतो ही व्याख्याच त्याने बदलून टाकली आहे. वेळप्रसंगी प्रथमेशने प्रेक्षकांचे टोमणे देखील खाल्ले आहेत मात्र अशा परिस्थितीला बाजूला सारून तो यशाचा एकेक टप्पा पार करताना दिसत आहे. तर क्षितिजा घोसाळकर ही देखील उच्च शिक्षित आहे. भाभा रिसर्च सेंटर मध्ये चांगल्या पगाराची नोकरी सोडून तिने आता पूर्णवेळ एनजीओसाठी काम करण्याचे ठरवले आहे. दोघांनाही आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.