अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक एक मॉडेल अभिनेत्री तसेच आता निर्माती म्हणून या इंडस्ट्रीत काम करत आहे. मंजिरी ओक आणि प्रसाद ओक यांचे लव्हमॅरेज आहे. लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ खूप कठीण असल्याने मंजिरीनेही नोकरी पत्करली होती. लोकांनी आपल्याला कितीही नावं ठेवली तरी आपलं काम आपण करत राहायचं या युक्तीने तिने मॉडेलिंग क्षेत्रात मोठं यश मिळवलं. सुधीला सुजित या आगामी चित्रपटाची ती आता निर्मिती करत आहे. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. काल रात्री उशिरा मंजिरी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. ट्राफिक असल्याने तिने रिक्षातून प्रवास करणे योग्य मानले.
पण रिक्षा चालकाची मुजोरी पाहून तिने त्या चालकाला हटकले. रिक्षा चालवत असताना तो चालक मोबाईलवर रिल्स बघत होता. हा प्रकार थांबत नसल्याचे पाहून माजिरीने चालकाला अगोदर सौम्य शब्दांत समन्स दिला. पण तरीही रिक्षा चालकाने मोबाईल बंद करायचे नाकारले. मी अशीच रिक्षा चालवतो या त्याच्या उत्तराला पाहून मंजिरीने ताबडतोब रिक्षा थांबवण्यास सांगितले आणि दुसरी रिक्षा पकडून पुढील प्रवास केला. पण यामुळे आपलं नुकसान होईल असा जरासुद्धा त्या रिक्षा चालकाने विचार केला नाही. याबद्दल मंजिरी म्हणते की, “पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ?
आणि ह्यावर ह्यांना काही बोलायच नाही . कारण ह्यांचीच अरेरावी ऐकून घेयला लागेल.
दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असा फ़ोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला…एकूणच कठीण आहे सगळं देव त्याला अक्कल देवो 🙏🏽”.