थरथरत्या अंगाने जीवनगौरव स्वीकारला….ऐन प्रसिद्धीच्या काळात अर्धांगवायूचा झटका येणाऱ्या कलाकाराला ओळखलं

नुकताच झी मराठी वाहिनीवर ‘झी नाट्यगौरव पुरस्कार’ सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ज्याची त्याची लव्हस्टोरी या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दीग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आणि रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर या दोघांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. गिरीश ओक, प्रशांत दामले यांनी प्रकाश बुद्धीसागर यांना मंचावर येण्यासाठी आधार दिला. थरथरत्या शरीराने त्यांनी हा गौरव स्वीकारला तेव्हा उपस्थितांनी उभे राहून प्रकाश बुद्धीसागर यांचे कौतुक केले.

नाट्यसृष्टीला झोकून देणारे प्रकाश बुद्धीसागर यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. आई शप्पथ, भ्रमाचा भोपळा, ब्रह्मचारी, शांतेचं कार्ट चालू आहे अशा अनेक गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन प्रकाश बुद्धीसागर यांनी केलं आहे. ऐन प्रसिद्धीच्या काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि आयुष्याला एक कलाटणी मिळाली. या परिस्थितीत जवळच्या लोकांनी तर साथ सोडलीच मात्र त्यांच्या अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूकही केली. आजारपणामुळे प्रकाश बुद्धीसागर शरीराने तर खचलेच पण मनानेही ते दुखावले गेले. पण म्हणतात ना की तुमचं आवडतं कामच तुम्हाला या खच्चीकरणातून बाहेर काढतं अगदी तसाच प्रयत्न करून प्रकाश बुद्धीसागर यांनी स्वतःला सावरलं. ‘गौना अभी बाकी है’ हे नाटक लिहून पुन्हा त्यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण केलं. हे नाटक प्रेक्षकांना लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळेल.