मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच “गुरू पूजा पंडित” हा कोर्स पूर्ण केला आहे. ‘आता मी स्वतःला गुरू पूजा पंडित म्हणू शकते का’ असे म्हणत प्राजक्ताने गुरू भानू नरसिंहन यांना प्रश्न विचारला आहे. दोन दिवसांपूर्वीच प्राजक्ता बंगलोर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन येथे गुरू पूजा हा कोर्स करण्यासाठी गेली होती. २२ देश आणि संपूर्ण भारतभरातून ६३० जण ह्यात सहभागी होते. हा कोर्स किती महत्वाचा आहे हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कुटुंबाला ठाऊक आहे असे म्हणत प्राजक्ताने त्या संस्थेतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “गुरुपूजा” हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आत्मज्ञानाचे संरक्षक असलेल्या आध्यात्मिक गुरुंच्या वंशाचा सन्मान करण्याचा पारंपारिक सोहळा आहे. गुरुदेव शी श्री रविशंकर यांच्या भगिनी डॉ. भानुमती नरसिंहन, यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली ही गुरुपूजा करायला शिकवली जाते.
गुरूपूजेचा जप केल्याने आपले मन सुंदर होते , ज्ञानात भर पडते आणि महान गुरुंच्या उपस्थितीची प्रगल्भता अनुभवायला मिळते.हा अभ्यासक्रम पूर्ण करताना एक आनंददायी अनुभव मिळतो.गुरू पूजा या कोर्समध्ये दोन भाग आहेत. पहिला भाग पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांनी दुसरा भाग पूर्ण करावा लागतो. काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ता तिचा हा पहिला भाग पूर्ण करण्यासाठी बंगलुरू येथे गेली होती. त्यावेळी प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना ‘लग्न करणं बंधनकारक आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. तेव्हा गुरू रवीशंकर यांचे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आले होते. गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जगप्रसिद्ध मानवतावादी, आध्यात्मिक, शांतता आणि मानवी मूल्यांचे दूत आहेत. आपल्या जीवनातून आणि कार्याद्वारे गुरुदेवांनी जगभरातील लाखो लोकांना तणावमुक्त आणि हिंसामुक्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. प्राजक्ता माळीची गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यावर श्रद्धा आहे. बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर हे असे ठिकाण आहे जिथे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. हे केवळ एक कॅम्पस नाही जे एखाद्याला त्यांची मनःस्थिती सुधारण्याची संधी देते तर अनेक प्रजाती, विविध वनस्पती, झाडे, फुलपाखरे आणि पक्षी यांचे घर देखील आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये जैव-विविधतेची झलक पहायला मिळते.