
झी मराठीवरील पारू या मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दिशाने पारूला एक नवं चॅलेंज दिलेलं आहे. ही नवीन संकटं सोडवता सोडवता पारूची मात्र पुरती दमछाक झाली आहे. त्यात अनुष्का देखील पारूला नाहक त्रास देताना दिसत आहे. पण यात अनुष्का आणि दिशाने मिळून हरीश विरोधात मोठा डाव आखला आहे. मालिकेतले हे एकामागून एक येत असलेले ट्विस्ट पाहून हरीश या सगळ्याचा खुलासा कधी करणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यात आता या मालिकेतून एका पात्राची एक्झिट होत आहे.
हे पात्र म्हणजेच मालिकेची खलनायिका आणि दिशाची बहीण अनुष्का आहे. अनुष्काची पोलखोल लवकरच होणार असल्याने मालिकेतून तिचा पत्ता कट करण्यात येणार आहे. अहिल्यादेवीसमोर अनुष्काचं कटकारस्थान उघडं पडणार असल्याने तिची किर्लोस्कर कुटुंबातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अर्थात अनुष्का ही दिशाची बहीण आहे हे मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे. अनुष्काची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात हिने नुकताच पारू या मालिकेला निरोप दिला आहे. शुटिंगचा शेवटचा दिवस म्हणत तिने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचे जाहीर केले आहे. श्वेता खरात हिने तिच्या अभिनयाने अनुष्काचे पात्र उत्तम निभावले होते.

हे पात्र विरोधी असल्याने अनेकांना तिचा राग यायचा. खरं तर एका कलाकारासाठी सजग अभिनयाची ही एक मोठी पावतीच ठरली आहे. पण आता इथून पुढे अनुष्काचे पात्र प्रेक्षकांना दिसणार नाहीए. श्वेता खरातने सहाय्यक भूमिकेपासून छोट्या पडद्यावर काम केले होते. मन झालं बाजींद मालिकेने तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळवून दिली. याच झी मराठीने तिला खलनायिका म्हणूनही ओळख मिळवून दिली. आयुष्यात अशा धाटणीच्या भूमिका साकारण्याची संधी खूप कमी कलाकारांना मिळत असते त्यात श्वेता खरातचे नाव नक्कीच घ्यावे लागेल.