सोलापूरच्या लेकीने सरकारी नोकरी सोडून गाढविणीच्या दुधापासून बनवते हा पदार्थ …गाढविणीच्या दुधाला देते तब्बल २००० प्रतिलिटर दर
‘गाढविणीच्या दुधापासून तुम्ही तुमची त्वचा सुंदर बनवू शकता’ असे जर कोणी तुम्हाला येऊन सांगितले तर तुम्ही त्याची नक्कीच खिल्ली उडवणार. परंतु हेच जर त्याने तुम्हाला असे सांगितले की ‘क्लियोपात्रा ही इजिप्तची राजकुमारी आणि फ्रेंच लष्करी नेता नेपोलियन बोनापार्टच्या बहिणीनेही या दुधाचा वापर करून तीची त्वचा टवटवीत ठेवली होती’ तर तुम्ही लगेचच त्यावर विचार करायला लागणार. कारण गाढव आणि गाढविणी यांना आपण सुरुवातीपासूनच खूपच हलक्या प्रतीचा दर्जा दिलेला आहे. जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता तेव्हा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हाच दृष्टीकोन बदलवून सोलापूरातील एका तरुणीने लाखो रुपयांची कमाई केलेली पाहायला मिळत आहे. मूळची दिल्लीची पण सध्या सोलापुरात वास्तव्यास असलेल्या अवघ्या २४ वर्षांच्या पूजा कौल या तरुणीने ही कमाल घडवून आणली आहे. पूजा कौलने Organiko या संस्थेची निर्मिती केली आहे. त्यातून ती Organiko – Beutifying Life या नावाने गाढवाच्या दुधापासून बनवलेले भारतातील पहिले १०० टक्के नैसर्गिक साबण तयार करण्याचा उपक्रम राबवला आहे.
संशोधनात असे सिद्ध झाले आहे की गाढवाच्या दुधात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, बी१, बी६, सी, डी, ई, ओमेगा ३ आणि ६, अमिनो एसिड भरपूर प्रमाणात असते. शिवाय त्यात कॅल्शियम आणि रेटिनॉलचे प्रमाणही जास्त असते, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तुळजापूरच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असताना पुजाचा तिथल्या स्थानिक गाढव मालकांशी संपर्क झाला. तिने गाढविणीचे दूध विकणार का? असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते गाढव मालक तिच्या या गोष्टीवर हसायला लागले. गाढविणीच दूध कुणी घेतं का आणि मुळात गाढव दूध देतं का? असाही प्रश्न विचारून तिची खिल्ली उडवण्यात आली. याबद्दल पूजा म्हणते की, “मला माझा अभ्यासक्रम संपवून सोलापूरला परत रहायचे होते आणि या प्रकल्पाला सुरुवात करायची होती. पण माझ्या कुटुंबाने मला या गोष्टीत साथ दिली नाही. एकीकडे माझ्या डोक्यात ही कल्पना होती आणि दुसरीकडे सरकारी नोकरी पण मला यातून एकाचीच निवड करायची होती. पण मला माझी स्वप्न कधीच सोडायची नव्हती. मी एका असामान्य कल्पनेवर काम करण्याचे स्वप्न घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता”. या वंचित समुदायांना मदत करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता, पूजाला यातून प्रेरणाच मिळणार होती. कॉलेजचे तिचे मित्र सुद्धा पूजाला ९ ते ५ नोकरी करण्याचा सल्ला देत होते. पण पूजा आपल्या मतावर ठाम राहिली. भारतात सुमारे ३.४ अब्ज गाढवे आहेत आणि एक लिटर गाढवीणीच्या दुधाची किंमत २,००० रुपयांपर्यंत असू शकते. हंगामी रोजगार समस्यांमुळे त्रस्त असलेल्या गाढव पाळणा-यांना यातून फायदा मिळवून देण्याचा तिचा मानस होता. तिचा हा प्रवास सुरु होण्यासाठी तीच्या एका शिक्षिकेने तिला मोठे प्रोत्साहन दिले होते.
व्यवसायास सुरुवात झाली तेव्हा गाढव मालकांकडून ती गाढविणीचे दूध 2,000 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करू लागली. या दुधापासून ती संपूर्णपणे नैसर्गिक पध्दतीने सौंदर्य साबण बनवू लागली. चारकोल, मध अशा स्वरूपात ती उत्पादन बनवू लागली. ऑनलाइन आणि ऑफलाइन विविध माध्यमातून तिने हे साबण ग्राहकांपर्यंत पोहोचवले. अवघ्या तीन महिन्यांतच ४९९ रुपये दराने विकलेला हा साबण १,००० हुन अधिक व्यक्तींनी खरेदी केला. या कामात पूजाला तिचा वर्गमित्र ऋषभ यश तोमर मदत करू लागला. आणि आता त्यांची सात जणांची टीम या व्यवसायात प्रमुख म्हणून काम करते आहे. ऑर्गेनिकोचा विस्तार आता संपूर्ण भारतभर झाला आहे. लोकांकडून या उत्पादनाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच हा व्यवसाय आता लाखोंची उलाढाल करताना दिसत आहे. विविध स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षिसांची रक्कमही ते हा उपक्रम पुढे नेण्यासाठी वापरतात. गाढविणीच्या दुधाचा विचार करून लोकांनी सुरुवातीला नाकं मुरडली होती, पण त्याच्या फायद्यांबद्दल जागरुकतेमुळे त्याला आता अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल पूजा म्हणते की, “ जेव्हा मी ऑर्गेनिको सुरू केली तेव्हा फक्त माझा आत्मविश्वास स्थिर होता, बाकी सर्व काही अनिश्चित होते . माझ्या कुटुंबातील बहुतेक सदस्य मीडिया इंडस्ट्रीत आहेत आणि त्यामुळे मला काहीतरी वेगळं करून सामाजिक क्षेत्रात सक्रिय व्हायचं होतं.जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही.”