झी मराठी वाहिनीवर “पारू” ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अतिशय शिस्तबद्ध असलेल्या अहिल्यादेवी किर्लोस्करांची झलक पाहायला मिळाली तर अभिनेता प्रसाद जवादे पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. पारूची भूमिका शरयू सोनवणे साकारत आहे. मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्करचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. पारू या मालिकेत सासूच्या भूमिकेत अहिल्यादेवी आहेत ही भूमिका मुग्धा कर्णिक हिने साकारली आहे. मुग्धाने झिम्मा, स्वाभिमान, शांतेचं कार्ट चालू आहे, होम स्वीट होम अशा मालिका, नाटक तसेच चित्रपटातून अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.
मुग्धा प्रसिद्ध पत्रकार मुकुंद कर्णिक यांची मुलगी आहे. तर मुग्धाची आत्या मीना कर्णिक यांनी प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. मीना कर्णिक या देखील प्रसिद्ध लेखिका तसेच पत्रकार आहेत. मुकुंद कर्णिक यांनी क्रीडा पत्रकारितेत मोठे नाव लौकिक केले होते. २०१९ मध्ये मुकुंद कर्णिक यांचे निधन झाले होते. त्यांची बहीण मीना कर्णिक यांनी अशोक सराफ यांच्या जीवनावर आधारित ‘मी बहुरूपी ‘ या पुस्तकाचे शब्दांकन केलेले आहे. तसेच अनेक इंग्रजी भाषिक पुस्तकांचे त्यांनी मराठी भाषेत अनुवाद लिहिलेले आहेत. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी आजवर त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चंदेरी दुनियेतील घडामोडींबद्दलही त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. त्यामुळे मीना कर्णिक यांना मराठी सृष्टीत एक चांगली ओळख आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांची भाची मुग्धालाही अभिनयाची आवड निर्माण झाली.
इरावती कर्णिक ही मुग्धाची बहीण आहे तिने मराठी सृष्टीत संवाद लेखिका म्हणून काम केले आहे. झिम्मा, मिडीयम स्पायसी अशा चित्रपटांचे तिने संवाद लिहिले आहेत. झी मराठी वाहिनीच्या पारू या मालिकेतून मुग्धाला दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या भूमिकेसाठी ती खूपच उत्सुक असून तिला या भूमिकेमुळे प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागणार आहे. तूर्तास मुग्धाला या नवीन मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.