पूर्वीच्या काळी चित्रपट, मालिकांचे शूटिंग करण्यासाठी कोल्हापूर गाठावे लागायचे. मधल्या काळात गोरेगाव फिल्मसिटीमध्ये हिंदी मराठी सह अनेक मालिका, चित्रपटांचे शूटिंग केले गेले. साताऱ्यातील पसरणी, वाई, बावधन अशा ठिकाणाला देखील चांगली पसंती दिली गेली. शूटिंगला पोहोचता यावे यासाठी ही जवळपासची ठिकाणं निवडली जायची. पण बदलत्या काळानुसार मालिका, चित्रपट सृष्टीत अनेक बदल घडून आलेले पाहायला मिळाले. गर्दीची ठिकाणं टाळून आता पुणे, मुंबईपेक्षा आजूबाजूच्या जिल्ह्यांना पसंती दिली जात आहे. शूटिंगच्या ठिकाणी राहूनच कलाकारांना आपले काम करावे लागत आहे. झी मराठी वाहिनीने बऱ्याचदा त्यांच्या मालिकांचे शूटिंग सातारा जिल्ह्यात केले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या “पारू” या मालिकेचे शूटिंग देखील साताऱ्यातच होत आहे. मालिकेतील किर्लोस्करांचा अवाढव्य व्हीला याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एखादं ठिकाण तुम्हाला किती आकर्षित करू शकतं हे या मालिकेच्या शूटिंग लोकेशनवरूनच तुम्हाला जाणवलं असेल.
मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा समोर आला होता तेव्हा किर्लोस्करांचा हा व्हीला सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसला. त्यामुळे मालिकेचे शूटिंग कुठे होतंय? आणि हा व्हीला कुणी बांधला?, किती एरीयात बांधला? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला इथे मिळणार आहेत. झी मराठी वाहिनीने पहिल्यांदाच पारू या मालिकेतून एवढि मोठी भव्य दिव्यता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेचे शूटिंग लोकेशन सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ असलेल्या दहिवड आष्टी या गावातले आहे. “Serenity villa” असे या व्हीलाचे नाव आहे. serenity चा अर्थ आहे शांतता. नावाप्रमाणेच हा व्हीला निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. निळेशार आणि विस्तारलेले उरमोडी धरणाचे पाणी, डोंगर, दऱ्या, हिरवीगार झाडी अशा निसर्गाच्या सानिध्यात हा व्हीला २०२१ रोजी मोठ्या दिमाखात उभा करण्यात आला आहे. हा व्हीला कोणाचा आहे ? याचे उत्तर मात्र गुपित ठेवण्यात आले आहे. पण कारवी डिझाइन स्टुडिओ यांच्यामार्फत सुमित बगाडे आणि वैदेही बगाडे या दोन साताऱ्यातील प्रसिद्ध आर्किटेक्टने हा व्हीला डिझाइन केला आहे. २०१९ मध्ये या व्हीलाच्या डिझाईनचे काम सुरू झाले. तब्बल ३ वर्षांच्या मेहनतीनंतर बगाडे यांनी २०२१ मध्ये हे बांधकाम पूर्ण केले. हे बांधकाम निवासी म्हणून बांधण्यात आले आहे त्यामुळे ही मालमत्ता खाजगी असल्याचे सांगण्यात येते.
अर्थात व्हीलाच्या मालकाचे नाव जाहीर करणे प्रकर्षाने टाळण्यात आले आहे. या व्हीलाचे खास वैशिष्ट्य असे की, दीड एकर परिसरात हा प्रोजेक्ट बनवण्यात आला आहे. त्यातील तब्बल १५,००० स्केअरफूट जागेत व्हीलाचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रशस्त गार्डन एरिया, स्विमिंगपूल यांनाही महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. व्हीलाच्या लागूनच धरण असल्याने इथला परिसर तुम्हाला आकर्षित करणारा ठरतो. हा व्हीला बनवण्यासाठी तब्बल ६ कोटींचा खर्च आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२०२२ मध्ये या प्रोजेक्टसाठी आर्किटेक्ट सुमित बगाडे यांना “नॅशनल अचिव्हर्स अवॉर्डने” सन्मानित करण्यात आले होते. झी मराठीवरील पारू या मालिकेचे निर्माते ‘तेजेंद्र नेसवणकर ‘ यांना हा व्हीला पाहताक्षणी आवडला. भली मोठी रक्कम मोजून हा व्हीला त्यांनी मालिकेच्या शूटिंगसाठी निवडला आहे.तेव्हा भविष्यात कधी फिरण्यासाठी तुम्ही उरमोडी धरण परिसरात गेला तर हा व्हीला नक्की बघा आणि इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्या.