मराठी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक सर्वच स्तरातून केलेलं पाहायला मिळतं. बॉलिवूडमध्येही मराठी कलाकारांना आता मोठमोठ्या संधी मिळू लागल्या आहेत. पण दक्षिणेत देखील मराठी कलाकारांना नावाजलं जातं हे वेगळं सांगायला नको. सयाजी शिंदे, रवी काळे हे कलाकार तर दक्षिणेत नाव कमवत आहेच पण आपल्या रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड यांनाही एक मोठे मानाचे स्थान तिथे मिळत आहे. एवढंच कशाला आता प्रवीण तरडे सारखा तगडा कलाकार दक्षिणेत मुख्य खलनायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रुती मराठे, सोनाली कुलकर्णी असे बरेचसे चेहरे देखील दक्षिणेत झळकले आहेत.
पण या यादीत आता बलकलाकारांचीही नोंद होऊ लागली आहे. ओवी भांडारकर हिनेही बालकलाकार म्हणून दक्षिणेत पाऊल टाकलेले आहे. ओवी ही मूळची पुण्याची. लहानपणापासूनच ओवीला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या मंचावर तिने चाईल्ड मॉडेल म्हणून रॅम्पवॉक केलेलं आहे. पुढे यातूनच ती अभिनयाकडे वळली. ओवी ही लहान असल्यापासूनच अभिनयाचे धडे गिरवत आहे. नाटकातूनच तिने रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले होते. यासोबतच ती कथकचेही धडे गिरवत आहे. अर्थात अभिनय क्षेत्रात जायचं या दृष्टीनेच तिचे तसे संगोपन होत गेले. अरनमानाई ३ या कॉमेडी प्लस हॉरर चित्रपटात ओवी झळकली होती. याशिवाय अन्नपुरानी चित्रपटातही तिने एक बालकलाकार म्हणून महत्वाची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाव्यतिरिक्त ओवीने व्यवसायिक जाहिरातींमध्येही काम केले आहे. चित्रपट, जाहिरातींच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात ओवी स्वतःची ओळख जपताना दिसत आहे. अर्थात यामागे तिच्या आई वडिलांचीही तेवढीच मेहनत म्हणावी लागेल. ओवीचे वडील वैभव भांडारकर आणि आई नेहमी तिला या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे ओवीच्या माध्यमातून एक मराठमोळी बालकलाकार दक्षिणेत सुद्धा नाव कमवू लागली आहे याचे कौतुक व्हायलाच हवे.