निशिगंधा वाड यांनी मराठी सृष्टीत स्वतःचं एक वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे. अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच मात्र यासोबतच त्या सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलींना त्यांनी दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर सुद्धा उभं केलं आहे. खरं तर हे गुण त्यांनी त्यांच्या आई डॉ विजय वाड यांच्याकडूनच हेरले होते. डॉ विजया वाड या बालसाहित्यिका तसेच लेखिका म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या , कथासंग्रह लोकप्रिय झालेल्या आहेत. लेखिका म्हणून विजया वाड जेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढ्याच त्या सामाजिक उपक्रमात सुद्धा सहभागी होताना पाहायला मिळाल्या. आदिवासी मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी काही मुलींना दत्तक घेतले होते. तर वेगवेगळ्या शाळेत जाऊन त्यांनी पर्यावरणाचे प्रकल्प, मराठी भाषा शुद्धी प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प सुद्धा राबवले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे हे गुण यांच्या दोन्ही मुलींनी अंगिकारले आहेत.
मराठी भाषेची उत्तम जाण, भाषेवर प्रभुत्व आणि शब्दांचा साठा हे सगळे गुण या मायलेकिमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात त्यांची मुलाखत ऐकत राहावीशी वाटते. या गुणी अभिनेत्रीने दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले आणि शेजारी शेजारी, अशी ही ज्ञानेश्वरी, एकापेक्षा एक, बंधन, प्रतिकार, बाळा जो जो रे, वाजवा रे वाजवा, नवरा माझ्या मुठीत गं, वाट पाहते पूनवेची, सासर माहेर, हर हर महादेव, तुमको ना भूल पाएंगे, दादागिरी अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप सोडली. या प्रवासात सह नायक दीपक देऊळकर यांच्यासोबत त्यांनी लग्नाची गाठ बांधली. दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांनी वाट पाहत पूनवेची , गृहप्रवेश, घरसंसार अशा काही मोजक्या चित्रपटातून एकत्रित काम केले. या दोघांनी मिळून मुलगी ईश्वरीच्या नावाने ‘ ईश्वरी व्हिजन’ ही निर्मिती संस्था उभारली.
यातून स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेवदत्त मालिकेची निर्मिती त्यांनी केली. ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कुलमधून शिक्षण घेतली होते. आता तिने पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे. नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या कलादर्पण अवॉर्ड सोहळ्यात ईश्वरीने हजेरी लावली होती. यावेळी ईश्वरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसली होती. श्री गुरुदेवदत्त या मालिकेच्या सेटवर सुद्धा ती अनेकदा आपल्या आई वडिलांसोबत यायची. ईश्वरीने करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे हा निर्णय सर्वस्वी तिचाच आहे. मात्र आज्जी डॉ विजया वाड आणि आई निशिगंधा वाड यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांची शीदोरी तिने आयुष्यभर जपावी. अर्थात तिने आपल्या आई वडिलांच्या उभारलेल्या निर्मिती संस्थेची जबाबदारी संभाळल्यास प्रेक्षकांना देखील ते निश्चितच आवडेल.