चला हवा येऊ द्या मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या निलेश साबळेची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे. नुकतेच निलेश साबळेने त्याच्या नव्या घरात गणेशपूजन केलेले पाहायला मिळाले. अभिनेते आणि पुजारी म्हणून मराठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेले अतुल वीरकर यांनी निलेश साबळेच्या या नवीन घरात गणेशपूजन केलेले आहे. २०२० मध्ये निलेश साबळेने त्याचं पहिलं घर खरेदी केलं होतं. कधी काळी अभिनयाच्या ओढीने कलानगरीत म्हणजेच मुंबईत दाखल झालेल्या निलेश साबळेला बस स्टॉपवर रात्र काढावी लागली होती. महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून तो पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकला होता. फु बाई फु या शोमधून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला.
नवरा माझा भवरा या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. पण त्याला खरी ओळख मिळवून दिली ती चला हवा येऊ द्याने. चला हवा येऊ द्या मध्ये अभिनय करता करता तो शोचे दिग्दर्शन, लेखन करू लागला. या शोने सर्वच कलाकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. त्यात निलेश साबळेनेही स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलं. या प्रवासात पत्नी गौरीची त्याला मोठी साथ मिळत गेली. निलेश साबळे याने मराठी मनोरंजन विश्वात भरीव योगदान दिलेलं आहे. चला हवा येऊ द्याची धुरा त्याने तब्बल १० वर्षे यशस्वीपणे सांभाळलेली पाहायला मिळाली होती. तो पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण अभिनयाची ओढ त्याला कला नगरीत घेऊन आली. त्याची पत्नी गौरी सहस्रबुद्धे या देखील आयुर्वेदिक तज्ञ आहेत. कॉलेजमध्ये असतानाच दोघांमध्ये प्रेमाचे सूर जुळले होते.
काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या हसताय ना या शोची धुरा त्याने सांभाळली होती पण काहीच दिवसात प्रेक्षकांनी पाठ फुरवल्याने शो बंद करावा लागला. सध्या चित्रपट, वेबसिरीज असे त्याचे आगामी प्रोजेक्ट आहेत. अशातच आता त्याची दुसऱ्या घराची स्वप्नपूर्ती पूर्णत्वास आलेली पाहायला मिळत आहे. प्रचंड ट्रोलिंग नंतरही खचून न जाता काम करत राहणे याच युक्तीने त्याचा हा प्रवास सुरु आहे. त्याच्या या स्वप्नपूर्तीचे मनःपूर्वक अभिनंदन.