नरेंद्र मोदींकडून मराठमोळी गायिका आर्या आंबेकरच कौतुक… अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेमध्ये श्रीरामांचं भजन “हृद्य में श्री राम हें”
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत श्री रामाच्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात आपलंही योगदान असावं असं भारतभरातून सगळ्यांनीच इच्छा व्यक्त केली आहे. पुण्यात तर श्रीरामासाठी जी वस्त्र बनवण्यात आली त्याचे धागे विणण्यासाठी नागरिकांनी सौदामिनी हँडलूम येथे ‘दो धागे राम के लिये’ असे अभियान राबवले होते. या अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. श्रीरामाचे मंदिर बनवण्यासाठी जे इंजिनिअर होते त्यातील काही इंजिनिअर हे महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जाते. तर श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मराठी संगीत क्षेत्रातील कलाकारांनी आपले योगदान दिलेले पाहायला मिळत आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी या खास सोहळ्यानिमित्त एक गाणं रचलेलं आहे
गायिका आर्या आंबेकर आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी हे गाणं गायलं आहे. ‘हृदय में श्री राम है’ असे या गाण्याचे बोल आहेत. आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते. हे गाणं ऐकून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांचे कौतुक केले आहे. “अयोध्या में होनेवाली प्राणप्रतिष्ठा को लेकर पुरा देश प्रभू श्रीराम की भक्ती के रंग में सरोबोर है। इसी भाव को लेकर सुरेश वाडकरजी और आर्या आंबेकरजी ने अपने सुमधुर सुरों में पिरोया हैं। “, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी दोघांचेही या योगदानाबद्दल कौतुक केले आहे. काहीच दिवसांपूर्वी आर्या आंबेकरला “फर्ग्युसन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
११ वी ते बीए अर्थशास्त्र या पाच वर्षांचा अभ्यासक्रम आर्याने फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केला होता. या महाविद्यालयाने अनेक अविस्मरणीय आठवणी दिलेल्या आहेत. त्यात आता संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आपलं कौतुक केलं जातंय हे पाहून आर्या आंबेकर खरोखरच भारावून गेली होती. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या कौतुकात आणखी एक भर म्हणून तिच्या गाण्याला थेट पंतप्रधानांकडूनच कौतुकाची एक मोठी थाप मिळालेली असल्याने आर्या खूपच भारावून गेली आहे.