मी नवस बोललो होतो देवाला की त्याचा अपघात होऊ दे हातपाय तुटू दे…नानांनी नसिरुद्दीन शहा बद्दलचा किस्सा केला शेअर
काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एक दिलखुलास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते नाम फाउंडेशन बद्दल तसेच बॉलिवूड सृष्टीतील नामवंत कलाकारांबद्दलही भरभरून बोलले. नाम फाउंडेशन आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा विस्तार आता देशभर झाला आहे. नाम फाउंडेशन मार्फत काश्मीर, गुवाहाटी, राजस्थान सारख्या राज्यातील शाळांचा विकास त्यांनी केला आहे. काश्मिरमध्ये त्यांनी सात शाळांची झालेली पडझड सुस्थितीत केली आहे. या कामात त्यांचा मुलगा मल्हारची देखील त्यांना साथ मिळत आहे. यासाठी नानांनी अनेकजनांकडे मदत मागितली. याबद्दल नाना म्हणतात की, ” मी कुणाकडेही गेलो तरी मला ५ – १० कोटी लागणार असे म्हटले की कोणही ते द्यायला लगेच तयार असतो.
” नाना पाटेकर यांना मध्येच थांबवत मुलाखतकार उदय निरगुडकर म्हणतात की, नाना तुम्हाला प्रत्येकजण ओंजळ भरून अगदी कोट्यांनी पैसे देतात ते तुमचं नाव आहे म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा तुमची प्रॉपर्टी विकून दान केलंय पण हे तुम्ही अजूनपर्यंत कुणाला सांगीतलेलं नाही”. तेव्हा नाना पाटेकर म्हणतात की, ” माझ्यावर लोकांचा विश्वास आहे, हे पैसे चुकीच्या दृष्टीने जाणार नाहीत म्हणून ही लोकं मला पैसे देतात. तुम्हाला असे किती पैसे लागतात ? जेवढे लागतात तेवढे आहेत की माझ्याकडे. त्याचा मी अजून संचय करत राहिलो तर त्या कागदाचे कपटे होतील ना…जिथे वापरायचेत तिथे ते वापरले जतायेत हे छानच आहे. मल्हारला जेवढं पाहिजे तेवढं खूप आहे. माझ्यासोबत आणखी काहीजण काम करतात तेवढं आहे आमच्याकडे . कॉलेज, हॉस्पिटल बांधून देण्यासाठी मी मुजुमदार यांच्याशी बोललो आहे. ६० कोटी मी चित्रपटातून कसेही कमवू शकतो. दुर्दैवाने आमचे तीन चांगले नट वारलेत इरफान ओमपुरी आणि ऋषी कपूर .त्या स्लॉटमधले सगळे रोल माझ्याकडे आहेत, हे वाईट आहे पण त्यांना वाटतं की मी ते करू शकेल.” यानंतर नाना पाटेकर यांनी ऋषी कपूर सोबतच्या मैत्रीचे किस्से सांगितले.
याचवेळी नाना पाटेकर यांनी नसिरुद्दीन शहा यांचे हातपाय तुटूदेत म्हणून नवस बोलल्याचा एक किस्सा सांगितला. “नसिरुद्दीन शहाला बरेच सिनेमे मिळत होते आणि मला काहीच कामं मिळत नसायची. मला नेहमी असं वाटायचं की त्याच्यात असं काय आहे जे माझ्यात नाही , थीएटरमधल्या मंडळींना प्रत्येकाला असं वाटत असे. मी नवस वगैरे बोललो होतो त्यावेळी देवाला की ह्याला काहितरी अपघात होऊ दे नाहीतर हातपाय तुटू दे. त्याचे सिनेमे मला फारसे नाही आवडले पण थिएटरमध्ये तो फंटास्टिक आहे. आइन्स्टाइन हे एकपात्री नाटक आहे मी त्याचं हे नाटक पाहिलं, मी बोलूच शकत नव्हतो, मी पुढे गेलो आणि त्याला नमस्कार केला. वेलकम मध्ये काम करत असताना तो एकटाच या नाटकाची रिहर्सल करत बसायचा. नाटक हा त्याचा ध्यास आहे माझा तो छंद होता.”