अजय सरपोतदार दिग्दर्शित मुंजा हा बहुचर्चित भयपट काल ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेव्हाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. मुंजा या चित्रपटाचा संबंध स्त्री या बॉलिवूड चित्रपटाशी जोडण्यात आलेला आहे. मुंजा आणि मुन्नीची ही एक अनोखी प्रेमकहाणी चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मुन्नीसोबत लग्न करण्याचे मुंजाचे स्वप्न असते. पण त्याआधीच मृत्यूने त्याला गाठलेले असते. मुन्नी ही त्याच्यापेक्षा ७ वर्षाने मोठी असते. या प्रेमाला मुंजाच्या घरच्यांचा विरोध असतो पण या विरोधाला न जुमानता मुंजा काळ्या जादूची शक्ती मिळवतो. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा तब्बल ७० वर्षाने या जगात प्रवेश करतो. चित्रपटाच्या नायकाला त्याचे अस्तित्व दिसत असते. मुंजाला मुन्नीपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास या चित्रपटात उलगडण्यात आला आहे. कॉमेडी प्लस हॉररमुळे चित्रपटाचे कथानक उत्कंठा वाढवणारे ठरले आहे. म्हणून चित्रपट पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले आहेत.
दरम्यान मुंबईत पार पडलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला खास आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी अमृता खानविलकर, प्रिया बापट, शरद केळकर, क्रिती सेनॉन यांनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. दरम्यान काल प्रदर्शित झालेल्या मुंजा चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. शर्वरीने या चित्रपटासाठी एक आयटम सॉंग देखील केलेले आहे. मुंजा हा मराठी कलाकारांचा चित्रपट म्हणूनही ओळख मिळवत आहे. कारण शर्वरी वाघ ही प्रमुख भूमिकेत तर आयुष उलगडे, खुशी हजारे हे मराठी बालकलाकार या चित्रपटात झळकले आहेत. तर हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, सुहास जोशी, अनय कामत, भाग्यश्री लिमये , अजय पूरकर यासारखे बरेचसे मराठी चेहरे चित्रपटाला लाभले आहेत.
त्यामुळे मराठी कलाकारांना घेऊन आदित्य सरपोतदार यांनी पुन्हा एकदा भली मोठी स्टार कास्ट असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. काल पहिल्याच दिवशी मुंजा चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आपल्या खात्यात ४ कोटी २१ लाखांचा गल्ला जमा केला आहे. तर चित्रपटाची आजची कमाई ही ३.७५ लाखांच्या जवळपास झाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ३० कोटी पेक्षा अधिक कमाई करू शकतो असे म्हटले जात आहे.