स्टँडअप कॉमेडियन तसेच हिंदी बिग बॉसच्या १७ व्या सिजनचा विजेता मूनव्वर फारुकी याने त्याच्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावरून जाहीरपणे माफी मागितली आहे. माफीनाम्याचा एक व्हिडिओ शेअर करताना त्याने त्यात तमाम कोकणी समाजातील लोकांची माफी मागितली आहे. मुनव्वर फारुकीने तळोजा येथे एक शो केला होता त्यात त्याने स्टॅण्डअप कॉमेडि करताना एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे एक मोठा वाद निर्माण झाला. या शोच्या व्हिडिओमध्ये मुनव्वर एका प्रेक्षकाला कुठून आलास असे विचारतो.
तेव्हा समोरचा व्यक्ती तळोजावरून आलोय असे सांगतो. “आता मी विचारलं म्हणून तळोजा सांगतोय, तळोजा मुंबईपासून वेगळी आहे. हे गाववाले लोकं विचारतात तेव्हा आम्ही मुंबईत राहतो असं बोलतात. हे कोकणी लोकं चू… करतात” असे वादग्रस्त विधान त्याने केले आहे. मात्र त्याने केलेला हा विनोद सर्वांनाच आवडला असे नाही त्यामुळे मूनव्वर एका नव्या वादात सापडला आहे. त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे तमाम कोकणी समाजाची मनं त्याने दुखावली आहेत. मूनव्वरने जाहीर माफी मागावी अशी भूमिका राजकीय स्तरातूनही मांडली जाऊ लागली आहे. नितेश राणे यांनी त्याला पाकिस्तानात पाठवणार असल्याची तंबी दिली आहे. तर अनेकांकडून त्याला सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात आहेत.
त्यामुळे घाबरलेल्या मुनव्वर फारुकीने माफीनाम्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, “काही दिवसांपूर्वी मी एक शो केला होता. तिथे मी प्रेक्षकांशी संवाद साधला, त्यात कोकणाबद्दल एक चर्चा होते. तळोजा येथे कोकणातील काही लोक राहतात आणि माझे अनेक मित्रही तिथे राहतात हे मला माहीत होते. पण मी कोकणाबद्दल काहीतरी वाईट बोललो आणि त्यांची खिल्ली उडवली असं त्यांना वाटलं. माझा हा हेतू मुळीच नव्हता. मला कोणालाही दुखवायचे नव्हते. माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझ्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागतो. या शोमध्ये मराठी, मुस्लिम आणि हिंदू सर्व समाजातील लोक होते. पण, कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू मुळीच नव्हता. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो.”असे मूनव्वर या माफी नाम्यात म्हणतो.