प्रेक्षकांनी ठरवलं तर मालिका वर्षानुवर्षे टिकून राहतात नाहीतर अल्प प्रतिसादामुळे नाईलाजास्तव मालिकेला गाशा गुंडाळावा लागतो. गेल्या काही दिवसांत कलर्स मराठी असो किंवा झी मराठी, सोनी मराठी, सन मराठी या वाहिन्यांवरील बहुतेक मालिका आटोपत्या घेण्यावर भर दिलेला आहे. काही मालिका तर नीट सुरूही होत नाहीत तेव्हाच त्यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. चांगले कथानक असूनही या मलिका केवळ टीआरपी मिळत नसल्याने बंद कराव्या लागल्या आहेत. महत्वाचं म्हणजे वाहिनीकडे हा सर्वस्वी निर्णय दिलेला असल्याने तिने आदेश दिला की निर्मात्यालाही हार मानावी लागते. अर्थात तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच हे नमूद केले असल्याने त्यांनाही वाहिनीचा निर्णय ऐकावा लागतो.
पण कलाकारांना मात्र यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. कुठलाही कलाकार आपली भूमिका सरस दिसण्यासाठी मोठी मेहनत घेत असतो. मग फिटनेसकडेही त्याला पूर्ण लक्ष द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच यासाठी मोठा खर्च त्यांना करावा लागतो. मोठ्या मेहनतीनंतर एखादी भूमिका मिळते पण टीआरपी अभावी मालिका आटोपती घेतली जाते. त्यामुळे बहुतेक टीव्ही कलाकारांमध्ये एक नाराजीचा सूर उमटू लागला आहे. एक मालिका संपली की दुसरी मालिका मिळवणे प्रत्येकासाठी सहजसोपे नसते. त्यांनाही कुटुंबाचा भार सांभाळावा लागतो. मालिका संपली की दुसरे काम कधी मिळेल याची शाश्वती देता येत नाही. अगोदर किमान दीड दोन वर्षे तरी मालिका सहज टिकून राहायच्या पण आता प्रत्येक वाहिनी टीआरपी मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागली आहे.
मालिका चालली नाही की ती लगेचच बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. एका मालिकेमुळे कित्येकांची घरं चालतात . पण हीच मालिका अचानक बंद पडली तर याच कुटुंबच्या पोटावर पाय पडतो. कित्येक कुटुंब या एका मालिकेवर अवलंबून असतात. मालिकेत काम करणारे आर्टिस्ट, असिस्टंट, स्पॉट बॉय हे सर्वस्वी या कामावर अवलंबून असतात. काम सुरू झाले आणि दोन तीन महिन्यांतच बंद पडले तर घर कसं चालणार? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा असतो. त्यामुळे निश्चितच या कलाकरांमध्ये एक असहाय्यतेचे वातावरण पाहायला मिळते.