
काल २५ एप्रिल २०२५ रोजी बहुचर्चित ‘झापुक झुपुक’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. केदार शिंदे या चित्रपटाकडून अपेक्षा ठेवून आहेत, प्रेक्षक आपल्याला निराश करणार नाहीत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. झापुक झुपुक हा चित्रपट एक काल्पनिक कथा आहे ही सुरजची बायोग्राफी नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाच्या कथानकाचा प्रेक्षकांना काहीसा अंदाज लावता आला. एका गरिबीत वाढलेल्या मुलाचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
चित्रपटाचे शूटिंग अवघ्या अडीच महिन्यात पूर्ण करण्यात आले असून सूरज चव्हाण आणि जुई भागवत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. मिलिंद गवळी, पुष्करराज चिरपुटकर, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, दीपाली पानसरे असे बरेचसे ओळखीचे चेहरे या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटात बरेचसे भावूक क्षण पाहायला मिळत आहेत. त्यात सुरजच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. पण काल प्रदर्शित झालेल्या झापुक झुपुक चित्रपटाला अल्पसा प्रतिसाद मिळाला. दरम्यान याच दिवशी महेश मांजरेकर यांचा देवमाणूस हा चित्रपट देखील प्रदर्शित झाल्याने दोन चित्रपटात थोडीशी स्पर्धा रंगलेली पाहायला मिळाली. दोन्ही चित्रपटांचे कथानक वेगवेगळे दोघेही कसदार दिग्दर्शक त्यामुळे दोघांमध्ये तुलना न केलेलीच बरी.

पण सूरज चव्हाणची एकंदरीत फॅन फॉलोइंग बघता बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने बऱ्यापैकी गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. काल पहिल्याच दिवशी पुण्यात थिएटर्स रिकामे असतानाही या चित्रपटाने जवळपास २४ लाखांचा गल्ला जमवलेला आहे. तर आज शनिवारी आणि उद्या रविवारी या कमाईच्या आकड्यात मोठी वाढ होईल असा अंदाज लावला जात आहे. झापुक झुपुक चित्रपटाचे कथानक सर्वसामान्य लोकांना आवडेल असेच आहे. यात प्रेम आणि भावनिक क्षण देखील रंगवण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.