मराठी सिनेमा नाट्यगृहात लावावा ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली? दिग्दर्शकाने घेतला खरपूस समाचार

मराठी सृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत अशी एक ओरड सुरू असते. पण यावर उपाय म्हणून नाट्यगृहात चित्रपट दाखवावेत अशी विचारसरणी पुढे येऊ लागली. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान अभिनित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याअगोदर देखील नाट्यगृहात चित्रपट दाखवले गेले पण हे असे प्रयोग करणे कितपत यशस्वी ठरतील यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहेत. अशा निर्णयामुळे मात्र आता निर्मातेही धजावताना दिसत आहेत. नुकताच एक असाच धक्कादायक अनुभव दिग्दर्शक डॉ शशिकांत डोईफोडे यांना आला आहे.
जर दीड दोन कोटी खर्च करून मी सिनेमा नाट्यगृहात प्रदर्शित करायचा तर मी ते का करू? एवढा खर्च कशासाठी करू? असा प्रश्न उपस्थित करून या निर्मात्याने चित्रपटच बनवायला नाकारला आहे. शशिकांत डोईफोडे यांनी देवमाणूस मालिकेत अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केलं आहे. लवकरच शशिकांत डोईफोडे आगामी चित्रपटाच्या प्रोजेक्ट निमित्त ठरलेली अमाऊंट घेण्यासाठी निर्मात्याकडे गेले होते. जवळपास २ कोटींचं बजेट असणारा ते एक नवीन मराठी चित्रपट बनवणार होते. मात्र निर्मात्याकडे पोहोचताच त्यांनी मराठी चित्रपटाच्या कमाई बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बालगंधर्वमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याचा व्हिडीओ निर्मात्याने शशिकांत डोईफोडे यांना दाखवला. ‘मराठी सिनेमा नाट्यगृहात दाखवण्याची वेळ येतेय…मग त्यासाठी मी २ कोटी रुपये का खर्च करू? माझी आताच चित्रपट करण्याची मानसिकता नाही.’ असे निर्मात्याने सांगून चित्रपटच करण्याचे नाकारले. शशिकांत डोईफोडे यांनी त्या निर्मात्यांना सर्वतोपरी सहकार्य दाखवले. आपण दर्जेदार चित्रपट दिल्यावर थीएटर मालक नक्कीच प्रतिसाद देतात असेही त्यांना सांगितले. पण निर्मात्याने ‘आता सिनेमा बनवावा अशी माझी मानसिकता नाही’ म्हणत त्यांनी नकार दर्शवला.

पण या अनुभवामुळे नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित होण्यावरून शशिकांत डोईफोडे यांनी त्यांचा संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, ”मराठी सिनेमा नाट्यगृहात दाखवावा ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यात आली माहीत नाही पण अशा कल्पनेमुळ मराठी सिनेमाचं नुकसान होतंय. मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नाहीत अशी ओरड करण्यापेक्षा मराठी सिनेमे दर्जेदार बनवावेत. जेणेकरून थिएटर मालक चित्रपट लागावेत म्हणून आपल्या मागे लागतील.”