मी कोणाची फसवणूक केली नाही आणि कोणी करत असेल तर त्याला सोडणार नाही….रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्रीची पुराव्यानिशी पोस्ट
आपली कामं अडून राहत असतील किंवा केलेल्या कामाचे पैसे मिळत नसतील तेव्हा सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम ठरू लागलं आहे. काही वर्षांपूर्वी शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊत आणि मृणाल दुसानिस यांनीही कामाचे पैसे मिळत नसल्याची पोस्ट शेअर केली होती. तर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिनेही याबद्दल आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. पण दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री विधीशा म्हसकर हिलाही अशाच गोष्टीला सामोरे जावे लागले आहे. पैसे देतो, पैसे किंवा दिलेल्याचे खोटे पुरावे सादर करून एका व्यक्तीने विधीशाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या व्यक्तीसोबत पैसे मिळणार असल्याची खात्री करूनच काम करा असा सल्ला तिने इंडस्ट्रीतील कलाकारांना दिला आहे.
त्या व्यक्तीचे नाव आणि काही पुरावे सादर करत विधीशाने सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने म्हटले होते की, ” नमस्कार मी विधीशा म्हसकर, कलाकार म्हणून आम्ही पैसे घेऊन सार्वजनिक कार्यक्रम करत असतो. सुजित सरकाले या व्यक्तीने गेल्या दोन महिन्यांपासून माझे मानधन थकवले आहे. माझा विश्वास बसावा म्हणून त्याने अगोदर झालेल्या दोन कार्यक्रमाचे पैसे देऊ केले. २३ मार्च २०२४ रोजी मी एक कार्यक्रम केला त्याचे मला अजूनही मानधन मिळालेले नाही. ‘मॅडम काय आपल्याच आहेत असे म्हणून तो ते पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. पण नंतर आणखी काही लोकांची त्याने फसवणूक केली हेही मला समजले. गेली दोन महिने तो खोटी कारणं देत आहे. खोटे गुगल पे आणि खोट्या चेकचे फोटो त्याने मला पाठवले. तिरिही माझ्या सहकलाकारांनी आणि आयोजकांना सावध करणं माझं कर्तव्य आहे. या व्यक्तीकडून कोणतही कार्यक्रम आला तर मानधन मिळणार असल्याची खात्री केल्याशिवाय करू नका. धन्यवाद.” असे म्हणत विधीशाने सोशल मीडियावर त्या व्यक्तीचे प्रोफाइलचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.
यासोबतच तिने कॅप्शनमध्ये असेही म्हटले आहे की, ” ही पोस्ट करण्यामागचे कारण , फसवणूक, खरं सांगून पैसे दिले नसते तरी चाललं असतं …पण फसवणूक मी कधी कोणाची केलेली नाही आणि कोणी करत असेल तर मी त्याला सोडणार नाही..आणि दुसऱ्यांचीही करू देणार नाही…सुजित सरकाले या व्यक्तीकडे खोटे आधारकार्ड आहेत. माझ्या कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी यापासून सावध राहावे हेच सांगेन. ” विधीशा म्हसकर हिच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. पण काही कालावधी नंतर विधीशाने ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवलेली पाहायला मिळाली. अर्थात तिला या पोस्टचा उपयोग झाला असावा आणि संबंधित व्यक्तीने तिच्या या तक्रारीची दखल घेतली असावी असा आता अंदाज बांधला जात आहे. किमान या माध्यमातून असाही उपयोग होऊ शकतो हे आता कलाकारांनी ओळखून घ्यायला हवे.