म्हणून अभिनेत्रीला नाकारलं… माझ्या १३-१४ वर्षांच्या अभिनय क्षेत्राच्या प्रवासातला तो धक्कादायक अनुभव
अभिनय क्षेत्रातील तुमचा अनुभव कितीही दांडगा असला तरी तुम्हाला ऑडिशन देणे भाग असते. मागच्या काही पिढीने याबद्दल अनेकदा ही खंत व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती. पण हल्लीच्या काळात तुम्ही कित्येक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असला तरीही तुम्ही उत्तम अभिनेते आहात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. तुमच्या नावे कितीही मालिका, चित्रपट ,नाटक असले तरी तुमचे फॅनफॉलोअर्स जास्त असतील तरच तुमची निवड करण्यात येते. हा धक्कादायक अनुभव गेल्या काही दिवसांत कित्येक कलाकारांनी घेतलेला आहे. तुम्ही सोशल मीडियावर किती लोकप्रिय आहात यावरून तुम्हाला काम द्यायचे की नाही? हे आता सर्वच ठिकाणी पाहिलं जात आहे. असाच एक धक्कादायक अनुभव मराठी मालिका अभिनेत्रीने देखील नुकताच घेतलेला आहे.
ही अभिनेत्री आहे रुपाली गायखे. रुपाली गायखे ही अभिनेत्री म्हणून गेली १३ ते १४ वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. छत्रीवाली, ग्रहण, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, संत गजानन शेगावीचे , आम्ही बेफिकर, मुस्कान अशा चित्रपट, मालिकांमधून रूपालीने अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही फॅशन शोसाठी तिला गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. नुकतेच रुपालीने एका नवीन प्रोजेक्टसाठी एक ऑडिशन दिली होती. या ऑडिशन मध्ये तिला “तुझे सोशल मीडियावर फॅन्स किती आहेत? ” असा आजवर कधीही विचारण्यात न आलेला एका आगळावेगळा प्रश्न विचारला.
रुपालीने इन्स्टाग्रामवर तिचे २ हजार फॉलोअर्स असल्याचे सांगितले तेव्हा तिला नाकारण्यात आले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत रुपालीने या ऑडिशनबद्दल हे योग्य आहे का? असाच एक प्रश्न उपस्थित केला. याबद्दल ती म्हणते की, तुम्हाला तर माहीतच आहे की मी एक अभिनेत्री आहे. मी गेली १३ ते १४ वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. मी सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसते. कारण माझं काम हे अभिनेत्री म्हणून टीव्ही माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतच. मी आज एका मिटींगला गेले, तिथे मला इंस्टावरचे फॉलोअर्स किती आहेत ते विचारले. मी इंस्टावर जास्त व्हिडीओ शेअर करत नाही आणि स्टोरीज पण टाकत नाही तेव्हा फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी कधी काही जास्त कामच केलं नाही. मी त्यांना दोन हजारापर्यंत फॉलोअर्स असल्याचं सांगितलं.
पण मला आज असं वाटायला लागलं की मी जे १३, १४ वर्षे या इंडस्ट्रीत काम केलंय ८ वर्षे थिएटर केलंय मी आजपर्यंत जेवढ काही काम केलंय ते काम करून मला मोठं व्हायचं होतं. पण इथे इंस्टावरील फॉलोअर्स पाहून मी पुढे काम करू शकते की नाही हे ठरवलं जातंय. मग मी घरी राहूनच व्हिडीओ शूट केले असते. मला कुणालाही वाईट किंवा दोषी ठरवायचं नाही. जे लोक घरी राहून व्हिडीओ बनवून फेमस होतात तेही त्यामागे मेहनत घेत असतात. पण मी या इंडस्ट्रीत येण्यासाठी स्वतःचं घर सोडलं एवढी वर्षे मुंबईत राहिले. हे जर घरातूनच करायचं होतं तर त्यासाठी मी घर सोडलं नसतं. इंस्टावरील फॉलोअर्स वरून तुम्ही उत्कृष्ट अभिनेत्री आहेत हे ठरवलं जातं का? मला यावर तुम्ही सल्ला द्या, मी काही जुन्या विचारांची नाही , सोशल मीडियाचा वापर करायलाच हवा मला स्वतःमध्ये हे काही बदल करायला हवेत का? मला अभिनय येतो त्यावर मला काम मिळायला हवं की इंस्टावरील फॉलोअर्स पाहून मला काम मिळायला हवं? मला या प्रश्नाचे उत्तर जरूर द्या”. असे म्हणत रुपालीने तिची खंत व्यक्त केली आहे.