
आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सेलिब्रिटी घर, गाडी खरेदी करताना दिसत आहेत. तर काही सेलिब्रिटी लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज गुढी पाडव्याचे औचित्य साधून गाथा नवनाथांची मालिका अभिनेत्रीने लग्नागाठ बांधलेली आहे. रुही तारु असे या अभिनेत्रीचे नाव आहे. मंदार कामठे या इंजिनिअरसोबत रुहीने पुण्यात लग्नागाठ बांधली आहे. गाथा नवनाथांची या मालिकेत रुहीने पार्वती मातेची भूमिका साकारली होती.

याशिवाय मोरूची मावशी या गाजलेल्या नाटकात ती निशाची भूमिका साकारताना दिसली होती. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ, प्रेमा तुझा रंग कसा, घेतला वसा टाकू नको अशा मालिकेत तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. द ट्रकर- एक प्रवास या फिल्मसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रायोगिक नाटकातून काम करत असताना रुहीला भरत जाधव यांच्या मोरूची मावशी नाटकात काम करण्याची संधी मिओळी होती. एका प्रेयसीची भूमिका साकारताना तिला खुप दडपण आले होते पण महिनाभर तालीम केल्यानंतर तिचे हे दडपण नाहीसे झाले.

यातूनच रुहीला मालिका सृष्टीत येण्याचा मार्ग गवसला. अनेक टीव्ही मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारत ती पुढे येत राहिली. मग चित्रपटातही तिला अभिनयाची संधी मिळत गेली. आज रुही तारु विवाहबद्ध झाल्याने सेलिब्रिटींनीही तिचे अभिनंदन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुहीच्या घरी लग्ना अगोदरच्या विधींना सुरुवात झाली होती. मेंदी, हळद, संगीत आणि आज त्यांचा लग्न सोहळा थाटात पार पडला. यानिमित्ताने रुही तारु आणि मंदार कामठे यांचे अभिनंदन!.